अजित पवार राजकारणी अनेक ठिकाणी डोळे मारतात -अमृता फडणवीस
राजकारण्यांची खूप लोकांशी जवळीक असते. ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात. त्यामुळे मला माहिती नाही की, कुठे कुठे कोण कोण डोळे मारत आहे, असे म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी विरोधीपक्ष नेते अजित पवारांना टोला लगावला आहे.
गेल्या 15 दिवसात अजित पवार यांच्या भाजप प्रवेशावरुन वावड्या उठल्या आहेत. खुद्द अजित पवार यांनी आपण जीवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच राहणार असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. मात्र त्यानंतरही घडणाऱ्या काही घडामोडींमुळे अजित पवारांच्या चर्चा थांबताना दिसत नाहीये. आता अमृता फडणवीस यांनी अजित पवारांबाबत सुरु असलेल्या चर्चांवर प्रतिक्रिया दिली आहे.
जो माणूस आणि पक्ष योग्य…
अमृता फडणवीस म्हणाल्या, मला वाटते महाराष्ट्र एक असे राज्य आहे जे खूप काही करू शकते. सध्या खूप काही करतही आहे. यासाठी जनतेला जो माणूस आणि पक्ष योग्य वाटेल, ते न्याय देऊ शकेल असे वाटेल त्यांनी सत्तेत यावे. तेच आपल्या महाराष्ट्रासाठी चांगले आहे. तो कुणीही असो. प्रत्येक माणसाने विचार करावा की, तो फक्त प्रगतीसाठीच काम करणार आहे. स्वतःच्या घरासाठी काम करणार नाही.
अजित पवार भाजपबरोबर येणार?
अमृता फडणवीस पुढे बोलताना म्हणाल्या, राजकारण्यांची अनेकांशी जवळीक असते. अजित पवार भाजपबरोबर येणार की नाही ते अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोघांनाच माहिती आहे. ते लोक खूप ठिकाणी डोळे मारतात. त्यामुळे मला माहिती नाही की, कुठे कुठे कोण कोण डोळे मारत आहे.
अजित पवारांचा CM पदावर दावा
अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात झालेल्या प्रकट मुलाखतीत ‘मी आजही मुख्यमंत्रिपदाचा दावा करू शकतो’ असे स्पष्टपणे सांगत प्रथमच आपली महत्त्वाकांक्षा जाहीरपणे व्यक्त केली. भविष्यात आपण सत्तेसाठी काँग्रेस, उद्धव सेनेप्रमाणेच भाजपसोबतही जाऊ शकतो. पण मुख्यमंत्रिपदाबाबत आता तडजोड करणार नाही, असे स्पष्ट संकेत अजित पवारांनी दिले आहेत.