कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून चालवणार नाही -पंकजा मुंडे
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत कार दुर्घटनेत निधन झाले होते. त्यांचा आज स्मृतीदिन आहे. यानिमित्त गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातून आलेले नागरिक अभिवादन करण्यासाठी एकत्र येतात. मात्र, पंकजा मुंडे यांची नाराजी आणि त्यांनी केलेले वक्तव्य त्यामुळे आज पंकजा मुंडे काय भूमिका घेतात, याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. मात्र, माझी भूमिका मी ठामपणे घेईल, कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवणार नसल्याचे पंकजा मुंडे यांनी म्हटले आहे.
पंकजा मुंडे म्हणाल्या की, मला परळी विधानसभा मतदार संघातून पराभव स्वीकारावा लागला. पण मला सहज काहीही मिळालेले नाही. पण काही मिळवण्यासाठी रडणाऱ्यांमधली मी नाही. मी सर्व काही मिळवण्यासाठी संघर्ष केला आहे. कोणाच्याच खांद्यावर बंदूक ठेवून मी चालवणार नाही. असेही पंकजा यांनी स्पष्ट केले.
ग्रामीण भागातील जनतेशी नाळ जोडलेला नेता आणि तळागाळातील माणसांशी नाते निर्माण करणारा नेता, अशी गोपीनाथ मुंडे यांची ओळख होती. त्यांच्या स्मृतीदिनानिमित्त गोपीनाथ गडावर महाराष्ट्रातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते एकत्र येतात. यंदाही गोपीनाथ गडावर त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती.
पंकजा मुंडे यांच्या वक्तव्यामुळे चर्चा
भाजपनेच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी ‘मी भाजपची असले तरी, भाजप माझा पक्ष नाही’ असे वक्तव्य केले होते. यावरून त्या भाजपमध्ये नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली होती. यातच राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे आज पंकजा मुंडे यांची भेट घेणार होते. त्यामुळे पंकजा मुंडे काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र, पंकजा यांनी तशी कोणतीच ठाम भूमिका घेतलेली नाही.