गुलाबराव पाटील कोणत्या पक्षाचे अध्यक्ष? – सुुप्रिया सुळें
अजित पवार हीच राष्ट्रवादी, ते जे बोलतील तोच आमदारांचा आकडा असेल, असा गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते तथा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या वक्तव्याचा खासदार तथा अजित पवारांची बहिण सुप्रिया सुळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. गुलाबराव पाटील कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत? असा टोला सुळेंनी लगावला आहे.
अजित पवार आपल्यासोबत 15 आमदारांना भाजपमध्ये घेऊन जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. त्या पार्श्वभूमीवर गुलाबराव पाटलांच्या या वक्तव्याची चर्चा होत आहे. गेल्या काही दिवसात पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रस फुटण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार आपल्या 15 आमदारांना घेऊन भाजपमध्ये जाणार असल्याचे बोलले जात आहे. संजय राऊत यांनीही काल भाजपचा राष्ट्रवादी फोडण्याचा डाव असल्याचे सांगत टीका केली होती.
काय म्हणाले गुलाबराव पाटील?
गुलाबराव पाटील म्हणाले, अजित पवारांसोबत बरेच आमदार आहे. मात्र, कोणत्याही लग्नासाठी तिथी आवश्यक आहे. सध्या अजित पवार हीच राष्ट्रवादी आहे. अजून कुळ बघावे लागेल. गुण जुळवावे लागतील व नंतरच ते काम करावे लागेल. आकडा ते सांगतील तो असेल तोच असेल, असाही पुनरुच्चार त्यांनी केला. नागपूरमध्येही महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा होणार असून ही सभा वज्रमूठ आहे की फुटलेली मुठ आहे हे उद्या दिसेल अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केली आहे.
काय म्हणाल्या सुप्रिया सुळे?
सुप्रिया सुळे म्हणाल्या, गुलाबराव पाटील कोणत्या पक्षाचे अध्यक्ष आहेत? माझे जनरल नॉलेज कमी असेल ते असतील एखाद्या वेळेस. माझे अजित दादाशी रोज बोलणे होते. मी आज माझ्या मतदारसंघात काम करण्यासाठी आले आहे, गॉसिप करण्यासाठी नव्हे, मला गॉसिप करायला वेळही नाही. प्रत्येक पक्ष बांधणी करत असतो, प्रत्येक पक्ष लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठीच काम करत असतो. त्यात गैर काय? असे म्हणत सुप्रिया सुळेंनी अमित शहांच्या दौऱ्यावर बोलणे टाळले.
अजित पवारांची प्रतिक्रिया
अजित पवार यांनी त्यांच्यावर होत असलेल्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. अजित पवार म्हणाले, माझ्यावर सगळ्यांच एवढे का प्रेम उतु चालले आहे? याआधी उद्य सामंत बोलले, दादा भुसे बोलले, त्यानंतर गुलाबराव पाटील बोलले. या सगळ्यांचे माझ्यावर प्रेम का उतु चालले आहे हे कळत नाही. आज महाविकास आघाडीची सभा आम्ही घेत आहोत. मी याठिकाणी येणार का, येणार तर भाषण करणार का, कुठे बसणार याबाबत चर्चांना उत आला होता.