दुर्मिळ अशा विषारी Bamboo Pit Viper (चापडा) सापाची भेट – पैगंबर शेख
निसर्गामध्ये विविध अशा वन्य जीवांच्या प्रजाती आहेत. काही आपल्याला बऱ्याचदा दिसतात तर काही क्वचितच कधीतरी मिळतात. सापांमध्ये जगभरात साधारण २५०० पेक्षा जास्त प्रजाती आहेत. त्यातील ३४० भारतात आहेत. तर त्यापैकी महाराष्ट्रात ५२ प्रजाती आपल्याला मिळतात. काही रोज निदर्शनास पडतात तर काही कधीतरी. तर वातावरणात होणारा बदल आणि माणसांकडून सलग जंगलांची होणारी नासधुस यामुळे काही प्रजाती या विलुप्त होण्याच्या मार्गावर देखील आहेत. वन्य प्राण्यामुळे माणूस धोक्यात आली की खूप चर्चा होते. पण माणसांमुळे सर्व वन्य जीव धोक्यात आलेत त्याची चर्चा होत नाही..
बांबू पिट व्हायपर हा साप घनदाट जंगल, झाडी मध्ये राहणारा साप. हा साप व्हायपर प्रजाती मधील असून घोणस इतकाच विषारी आहे. हा साप वरून पाहिल्यास पूर्णपणे हिरवा दिसतो. तर खालची बाजू ही पिवळ्या रंगाची असते. याचे डोके हे त्रिकोणी आकाराचे असते. या सापाचा आणि माणसाचा सहसा संपर्क येत नाही. रात्री वाई वरून एक टेम्पो वारजे मध्ये आला त्या टेम्पो मध्ये साप असल्याची माहिती आमचे सर्पमित्र मनोज आणि प्रतिक यांना मिळाली. खूप लांबचा प्रवास करून आलेला हा साप त्यांनी रेस्क्यू केला आणि आज या सापाला निसर्गाच्या अधिवासात सोडण्यात आले.
जगामध्ये वन्यजीव धोक्यात आले तर मानव ही प्रजाती धोक्यात येईल. पण मानव प्रजाती जर धोक्यात आली तर जगात काहीही फरक पडणार नाही. कारण निसर्गाला माणसाचा काहीही फायदा निदान मलातरी दिसून आलेला नाही. माणूस झाडे तोडतो, कचरा करतो, प्रचंड अशी घाण या पृथ्वी तलावर पसरवतो, नद्या आणि विहिरी देखील घाण करतो. वन्यप्राणी हे पृथ्वीचे संवर्धन करतात तर माणूस पृथ्वीचा ह्रास करतो. हे वास्तव आहे…
वन्यप्राणी आणि त्यांचे अधिवास म्हणजेच जंगले वाचवली पाहिजेत. ही पृथ्वी फक्त माणसांची नाही. तर इथे असलेल्या वन्य जीवांची पण आहे हे आता माणसाला सांगणे खूप गरजेचे आहे. #समजलंतरठीक