नापास व कमी गुणांमुळे 48 तासांत 10 विद्यार्थ्यांची आत्महत्या…
आंध्र प्रदेशात गत 48 तासांत तब्बल 10 विद्यार्थ्यांनी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपवली आहे. अन्य 2 विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. पण सुदैवाने ते बचावले. आंध्र प्रदेश उच्च माध्यमिक मंडळाने बुधवारी इयत्ता 11 वी व 12 वीचे निकाल घोषित केले. त्यानंतर या विद्यार्थ्यांनी नापास व कमी गुण मिळाल्यामुले आपल्या जीवनयात्रा थांबवली.
आंध्र प्रदेश बोर्ड ऑफ इंटरमीडिएटच्या माहितीनुसार, यावेळी तब्बल 10 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी 11वीचे 61%; तर 12वीचे 72% विद्यार्थी उत्तीर्ण झाले.
प्रकरण 1: यासंबंधीच्या वृत्तानुसार, बी तरुण (17) नामक विद्यार्थ्याने श्रीकाकुलम जिल्ह्यात रेल्वेपुढे उडी मारून आत्महत्या केली. तरुण दांडू गोपालपुरम गावचा होता. इंटरमिजिएट प्रथम वर्षाचा हा विद्यार्थी बहुतांश पेपरमध्ये नापास झाला होता. यामुळे आलेल्या नैराश्यामुळे त्याने आत्महत्या केली.
प्रकरण 2: मलकापुरम पोलिस ठाणे हद्दीतील त्रिनादपुरम येथील एका 16 वर्षीय मुलीने तिच्या राहत्या घरी आत्महत्या केली. ती विशाखापट्टणम जिल्ह्यातील रहिवासी आहे.
प्रकरण 3: अखिलश्री इंटरमिजिएटच्या पहिल्या वर्षाला होती. काही विषयात नापास झाल्याने ती निराश झाली होती.
चौथे प्रकरणः विशाखापट्टणमच्या कांचरापलेम भागात एका 18 वर्षीय तरुणाने स्वतःच्या घरातच गळफास लावून आत्महत्या केली. तो द्वितीय वर्षाचा विद्यार्थी होता. एका विषयात नापास झाल्याने त्याने हे पाऊल उचलले.
पाचवी घटना: चित्तूर जिल्ह्यातील एका 17 वर्षीय विद्यार्थिनीने तलावात उडी मारून आत्महत्या केली. परीक्षेत नापास झाल्याने ती नैराश्यात गेली होती.
सहावी घटना : चित्तूर जिल्ह्यातीलच अन्य एका 17 वर्षीय विद्यार्थ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली. परीक्षेत नापास झाल्याने हा विद्यार्थीही निराश झाला होता.
सातवी घटना : अनकापल्ले येथे 17 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. परिक्षेत कमी गुण पडल्यामुळे तो तणावाखाली होता.
याशिवाय आणखी 3 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्यांचा तपशील अद्याप समोर आला नाही. यासंबंधीच्या वृत्तानुसार, इतर 2 विद्यार्थ्यांनीही आत्महत्येचा प्रयत्न केला. पण ते बचावले.