महाराष्ट्र

नाशिकमध्ये भरधाव बस घाटात उलटली:30 हून अधिक प्रवासी जखमी, 10 गंभीर

नाशिकमध्ये चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. हरसुल परिसरातील घाटात चालकाचा ताबा सुटल्याने ही बस रस्त्यावरच उलटली. त्यामुळे बसमधील 30 प्रवासी जखमी झाले आहेत. यातील 10 जणांची परिस्थिती गंभीर आहे.

बसमध्ये 57 प्रवासी होते

मिळालेल्या माहितीनुसार गुजरातमधील काही भाविक 3 बसद्वारे नाशिकच्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर येथे दर्शनासाठी आले होते. शुक्रवारी सायंकाळी दर्शन घेऊन हे भाविक 3 बसद्वारे परत गुजरातकडे निघाले होते. अपघातग्रस्त बसमध्ये 57 प्रवासी होते.

बसच्या काचा फोडून जखमींना बाहेर काढले

गुजरातच्या दिशेने जात असताना हरसुल येथील घाटात बसवरील चालकाचा ताबा सुटला. त्यामुळे बस रस्त्यावरच उलटली. नशिब बलवत्तर म्हणून बस दरीत कोसळली नाही. बस उलट्या दिशेने घाटावरच कोसळली. बसचा अपघात होताच उर्वरित दोन्ही बसही तातडीने थांबवण्यात आल्या. इतर इतर बसमधील नागरिकांनी उतरुन तातडीने मदत सुरू केली. बसच्या काचा फोडून प्रवाशांना त्यातून बाहेर काढण्यात आले.

सर्व प्रवासी कच्छमधील

सुदैवाने अपघातात जीवित हानी झाली नाही. मात्र, 30 हून अधिक प्रवासी जखमी झाले. जखमींना तातडीने नाशिकच्या ग्रामीण रुग्णालयासह जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. जखमींपैकी 10 जणांची स्थिती गंभीर आहे. सर्व प्रवासी गुजरातमधील कच्छ येथील असल्याची माहिती आहे.

अपघात कशामुळे झाला?

प्राथमिक माहितीनुसार, घाटात बसचा वेग अधिक होता, अशात अचानक वळण आल्याने चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. ऐन घाटात ही बस उलटल्याने मदत मिळण्यास उशीर झाला. सुरुवातीला स्थानिक गावकऱ्यांनी अपघातग्रस्तांना मदत केली. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. त्यानंतर रुग्णवाहिकेच्या माध्यमातून जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel