निवडणुकीमध्ये भाजपचा प्रचार केल्याचा आरोप करत भावावर कोयत्याने हल्ला
लोकसभा निवडणुकीत भाजपचा प्रचार करून लै पुढारपण करत होतास. तुला मस्ती आलीय का, तुला बघूनच घेतो असे म्हणत लोखंडी कोयत्याने चुलत भावाच्या हातावर वार केल्याची घटना घडली आहे. डोक्यावर वार होत असताना तो हातावर झेलल्याने मोठा अनर्थ टळला. याप्रकरणी प्रमुख चौघांसह आठ जणांवर गुन्हा नोंद झाला आहे. ही घटना वडार गल्ली, गांधीनाथा शाळेसमोर, बाळीवेस या ठिकाणी घडली आहे. ऋतिक संतोष भिंगारे, यश संतोष भिंगारे, तुषार संतोष भिंगारे, संतोष भिंगारे (सर्व रा. काशी कापडे गल्ली) आणि चार अनोळखी आरोपी आहेत. याबाबत बालाजी सुरेश भिंगारे (वय ३२, रा. मराठा वस्ती) यांनी फिर्याद दिली असून सोमवारी रात्री गुन्हा नोंद झाला.
फिर्यादी घरासमोर गणपती मंदिराजवळ थांबला होता तेव्हा ऋतिक भिंगारे हा फिर्यादीजवळयेऊन भाजपचा प्रचार केल्यावरून शिवीगाळ करू – लागला. त्यानंतर फिर्यादी व आत्ते भाऊ अमोल कुंदुर हे चहा पिण्यासाठी रात्री पावणे एकला शिवाजी चौकात दुचाकीवरून गेले. चहा पिऊन घराकडे परतताना हातात लोखंडी कोयता घेऊन दुचाकी अडवली. ऋतिक याने कोयता डोक्यावर मारताना फिर्यादीने वार डाव्या हातावर झेलला. हाता गंभीर दुखापत होऊन हाड मोडले. कुंदुर यास लोखंडी रॉडने मारून जखमी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.