मुलाचा खून केल्याप्रकरणी पित्याची निर्देष मुक्तता
सोलापूर दि:- रघुनाथ राजेंद्र जानकर, वय:-28 याचा खून केल्याप्रकरणी वडील राजेंद्र रघुनाथ जानकर,वय:-50, रा:- कल्लप्पावाडी,ता:-अक्कलकोट, जिल्हा:-सोलापूर यांस तदर्थ जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री एम.ए.भोसले यांनी निर्दोष मुक्तता केली .
यात हकीकत अशी की, दिनांक 30/9/2021 रोजी रात्री साडे अकराच्या सुमारास रघुनाथ हा दारूचे नशेत वडील राजेंद्र यास “शेत विकून मला पाच लाख रुपये द्या, मला ट्रॅक्टर घ्यायचे आहे” असे म्हणून शिवीगाळ करू लागला, त्यावेळी आरोपी राजेंद्र याने “मी पैसे देणार नाही” असे म्हणाला असता रघुनाथ याने वडीलास शिव्या देऊन कॉलर पकडले व त्यास ढकलून दिले, त्यावेळी आरोपी वडिलांनी शेजारी पडलेल्या कुऱ्हाडीने मुलगा रघुनाथ याच्या डोकीत जोराने वार केला, त्यावेळी रघुनाथ हा जागीच ठार झाला,अशा आशयाची फिर्याद मयत रघुनाथ याचा भाऊ मंगलदास जानकर याने अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून आरोपीस अटक केली होती. त्यावर पोलिसांनी तपास करून दोषारोप पत्रक दाखल केले होते.
खटल्याच्या सुनावणीच्या वेळेस आरोपीचे वकील एडवोकेट मिलिंद थोबडे यांनी आरोपी हा घटना घडली त्या घरात असल्याबाबतचा पुरावा सरकार पक्षाने शाबित केलेला नाही, त्यामुळे आरोपीने मयतास मारहाण केली असे म्हणता येणार नसल्याचा युक्तिवाद मांडला, तो ग्राह्य धरून न्यायाधीशांनी आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपीतर्फे ऍड.मिलिंद थोबडे, ऍड.विनोद सूर्यवंशी, ऍड.दत्ता गुंड,ऍड.अमित सावळगी तर सरकारतर्फे ऍड. गंगाधर रामपुरे यांनी काम पाहिले.