शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानावर व भू-पर्यावरणीय संशोधन व्हावे: कुलगुरू प्रा. महानवर
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात राष्ट्रीय चर्चासत्र
भारत हा कृषिप्रधान देश आहे. शेती व शेतकऱ्यांवरच देशाची प्रगती अवलंबून आहे. आज बदलत्या हवामानाचा आणि भू-पर्यावरणाचा मोठा फटका शेतीला बसत आहे. त्यामुळे शेती सुधारण्यासाठी व शाश्वत विकासासाठी बदलत्या हवामानाबरोबरच भू-पर्यावरणशास्त्रात चांगले संशोधन व्हावे, अशी अपेक्षा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले.
विद्यापीठातील भूशास्त्र संकुलाच्यावतीने पीएमउषा अंतर्गत ‘शाश्वत विकासासाठी हवामान बदल आणि भू-पर्यावरणीय नवकल्पना’ या विषयावर दोन दिवसीय आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन कुलगुरू प्रा. महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी विभागप्रमुख डॉ. प्रवीण सप्तर्षी, भूगर्भशास्त्र विभागप्रमुख डॉ. धवल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून राष्ट्रीय चर्चासत्राची माहिती दिली.
कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले की, शेतकऱ्यांनी आपल्या शेतात सतत वेगवेगळे पिके घेणे आवश्यक आहे. त्यामुळे मातीची गुणवत्ता व पोत सुधारते. जर एकच पीक आपण सतत घेतल्यास जमीन नापीक बनते. त्याचबरोबर चांगल्या हवामानासाठी व संतुलित पर्यावरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षांची लागवड व संवर्धन होणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्वांनी काम करणे आवश्यक असल्याचेही कुलगुरू प्रा. महानवर म्हणाले. डॉ. प्रवीण सप्तर्षी यांनी वातावरण कसे बदलत चालले आहे, याविषयी माहिती दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी शाश्वत उपाययोजना करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. शाश्वत तंत्रज्ञानाचाही वापर होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या राष्ट्रीय चर्चासत्रासाठी देशभरातून जवळपास 100 जणांनी सहभाग घेतला आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुलभा बनसोडे यांनी केले तर आभार डॉ. प्रशांत उनाळे यांनी मानले.
फोटो ओळी
सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आयोजित राष्ट्रीय चर्चासत्राचे उद्घाटन करताना कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर, डॉ. प्रवीण सप्तर्षी, डॉ. धवल कुलकर्णी प्रमुख, भूशास्त्र संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप व अन्य.