सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल; पिस्तुलाचा परवानाही रद्द, – देवेंद्र फडणवीसांची
मुंबई : वरळीत झालेल्या गोळीबार प्रकरणी आमदार सदा सरवणकर, समाधान सरवणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी दिली.
याप्रकरणी सदा सरवणकर यांचा पिस्तुलाचा परवानाही रद्द करण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधकांनी विविध मुद्द्यांद्वारे उपस्थित केलेल्या चर्चेला उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, लोकप्रतिनिधी खासगी व्यक्तींकडून झालेला गोळीबार सदा सरवणकर यांच्यासंदर्भात विषय आला होता. या नमूद गुन्ह्यात १४ साक्षीदार तपासले. सदा सरवणकर, त्यांचा मुलगा समाधान सरवणकर अशा ११ आरोपींना कलम ४१ (अ -१)अंतर्गत नोटीस देण्यात आली.
लायसन्सधारी पिस्तूल स्वत:जवळ बाळगणे आवश्यक असताना त्यांनी ते वाहनात ठेवले म्हणून त्यासंदर्भात आर्मस्स ॲक्टअंतर्गत त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. लायसन्स आणि अन्य शर्थींचा उल्लंघन केल्यामुळे त्यांचे शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई सुरू करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.
दहिसरमधील हल्ल्याप्रकरणी…
दहिसरमधील भाजप कार्यकर्ता बिभीषण वारे हल्ल्याप्रकरणी सुनील मांडवे याच्यासह अनेक आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचे फडणवीस म्हणाले. पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरित आरोपींना अटक करण्यासाठी सहा पथके तयार करण्यात आली आहेत. यावेळी अनिल परब यांनी हा जीवघेणा हल्ला असल्याने ३०७ कलम लावण्याची मागणी केली. मेडिकल रिपोर्ट तपासून त्यानुसार अन्य आवश्यक कलमेही लावण्यात येतील. यासंदर्भात स्वतंत्र चौकशी करूच तसेच पोलिसांना कुचराई केली असेल तर त्यांच्यावर कारवाई करायलाही मागे पाहणार नाहीत, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.