समृद्धी महामार्गावरील सेलू तालुक्याजवळ अपघात, तीन जण जागीच ठार!
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात तीन जण जागीच ठार झाले आहेत. वर्धा जिल्ह्याच्या सेलू तालुक्यातील महाबळा परिसरात समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री साडेबारा वाजता हा अपघात झाला.
डॉक्टर ज्योती क्षीरसागर (रा. मालेगाव, जिल्हा -वाशीम ), डॉक्टर फाल्गुनी सुरवाडे (रा.अमरावती ), भरत क्षीरसागर (रा. मालेगाव, जिल्हा -वाशीम) यांचा मृत्यू झाला.
कसा झाला अपघात?
समृद्धी महामार्गावर नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकला भरधाव कारने मागून धडक दिली. यात कारमधील दोन डॉक्टर मैत्रिणीसह एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. नागपूरला कामानिमित्त रात्री समृद्धी महामार्गाने जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. यात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे.
घटनेचा पंचनामा
घटनेची माहिती मिळताच जाम महामार्ग पोलिस चौकीतील पोलिस उपनिरिक्षक दिलीप थाटे घटनास्थळी पोहोचत त्यांनी वाहतूक सुरळीत केली. महामार्ग पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत सेलू पोलिसांना माहिती दिली. तीनही मृतदेह सेलूच्या ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. घटनेचा अधिक तपास सुरू आहे.