सीताफळाचा रामायणाशी काय आहे संबंध? फळाचं नाव सीता मातेवरुनच का ठेवलं गेलं?
मुंबई, 16 नोव्हेंबर : हिवाळ्याची चाहूल लागताच सफरचंदासह सीताफळाच्या हंगामाची चाहूल लागते. थंडीच्या दिवसात चांगल्या आरोग्यासाठी फळं खाण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. या ऋतूत ही दोन फळं प्रामुख्याने मिळतात.
सीताफळ हे चवीला गोड असतं; पण ते फार काळ टिकत नाही. आजकाल सीताफळाचा गर टिकवून ठेवण्यासाठी त्यावर प्रक्रिया केली जाते. तसंच त्याच्यावर प्रक्रिया करून पदार्थ तयार केले जातात. सीताफळात अनेक पोषक घटक असतात. त्यामुळे आरोग्यासाठी सीताफळाचं सेवन हितावह मानलं जातं.
आपल्याकडे सीताफळ आणि रामफळ अशा दोन फळांची नावं श्रीराम आणि माता सीतेच्या नावावरून आली आहेत. त्यामुळे रामायण काळाशी सीताफळाचा काही संबंध आहे का, असा प्रश्न साहजिकच प्रत्येकाला पडतो. या विषयी जाणून घेऊया.
सीताफळाचं नाव ऐकलं की त्याचा सीता मातेच्या नावाशी काय संबंध अशी उत्सुकता प्रत्येकाच्या मनात तयार होते. खरं तर हिवाळ्यात सीताफळाला मागणी वाढते. या हंगामात प्रत्येक वयोगटातली व्यक्ती हे फळ आवडीने खाते. सीताफळात पोषक घटक मुबलक प्रमाणात असतात शिवाय त्याची चव देखील मधुर असते. त्यामुळे विशेषतः लहान मुलं आवडीनं हे फळ खातात. सीताफळात कॅलरीज जास्त असतात. तसंच लोहदेखील मुबलक असतं. या फळाचा रामायणाशी काही संबंध आहे का, या प्रश्नावर ज्योतिषाचार्य पंडित अरविंद त्रिपाठी यांनी मार्गदर्शन केलं आहे.
त्यांनी सांगितलं की, ”काही पौराणिक ग्रंथांमधील संदर्भानुसार, जेव्हा रावणानं सीतामातेचं अपहरण केलं तेव्हा ती खूप दुःखी होती. ती भगवान श्रीरामाच्या आठवणीनं व्याकुळ झाली होती. या वेळी सीतेच्या डोळ्यातून सतत अश्रू ओघळत होते. हे अश्रू जंगलात पडले आणि त्यातून सीताफळाचं झाड उगवलं. त्यामुळे या झाडाला सीतेच्या नावावरुन सीताफळ असं नाव पडलं.”
”दुसऱ्या एका संदर्भानुसार, या फळाला मोठा इतिहास आहे. पौराणिक कथांमध्ये सांगितल्याप्रमाणे वनवासावेळी भगवान श्रीराम सीता मातेसाठी हेच फळ खाण्याकरिता घेऊन येत असत. वनवासाच्या काळात सीतेला हे फळ अत्यंत आवडले होतं. त्यावरून या फळाचं नाव सीताफळ पडलं असावं,” असं त्रिपाठी यांनी सांगितलं.
एकूणच सीताफळाला पौराणिक संदर्भ आहेत. हे फळ कित्येक वर्षांपासून सेवन केलं जात आहे. यातील पोषक घटक आरोग्यासाठी उत्तम असतात. त्याशिवाय सीताफळाच्या पानांचा वापर वेगवेगळ्या कारणांसाठी होतो.