सोलापूरमध्ये एम्स रुग्णालय उभा करा, राज्य सरकार मदत करेल; खासदार प्रणिती शिंदे यांचे केंद्रीय आरोग्यमंत्र्यांना पत्र
खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापूरच्या विकासाच्या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सोलापूरमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थान (एम्स) उभारण्यासाठी त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री जगत प्रकाश नड्डा यांना पत्र पाठवून मागणी केली आहे. प्रणिती शिंदे या खासदार झाल्यापासून सोलापूरच्या विविध विकास प्रकल्पांवर सातत्याने लक्ष केंद्रित करत आहेत. ज्यात विमानतळ विकास, रेल्वे सुविधांचा विस्तार, युवकांचे प्रश्न आणि शेतकऱ्यांचा विज, पाणी, हमीभाव या सारख्या प्रश्न सोडविण्यासाठी त्यांनी दिल्ली दरबारी पाठपुरावा सुरू केला आहे. त्याचप्रमाणे आता त्यांनी सोलापूरसाठी एम्सची मागणी केली आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री नड्डा यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे की, सोलापूरची भौगोलिक स्थिती आणि लोकसंख्या पाहता सोलापूर जिल्ह्यासह आजूबाजूच्या जिल्ह्यातील नागरिकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे आहे. यासाठी सोलापूरमध्ये एम्स सारख्या अद्ययावत रुग्णालयाची आवश्यकता आहे. सोलापूर हा पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक, औद्योगिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या एक महत्त्वाचा जिल्हा मानला जातो. सोलापूर शहरात लोकसंख्येची घनता अधिक आहे. शिवाय ग्रामीण भागात आरोग्याच्या सोयी सुविधा उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे विविध आजारांवर उपचार करण्यासाठी नागरिकांना शहरात धाव घ्यावी लागते. या पार्श्वभूमीवर सोलापूरमध्ये एम्सची स्थापना होणे एक गरजेची बाब असून त्याचा लाखो रुग्णांना फायदा होणार असल्याचे शिंदे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
आरोग्य सेवांच्या उभारणीसाठी एम्ससारख्या अत्याधुनिक रुग्णालयाची आवश्यकता असल्यामुळे शिंदे यांनी संसदेत सोलापूरसाठी ही मागणी उपस्थित केली आहे. सोलापूरच्या आरोग्य व्यवस्थेची सुधारणा आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने उच्च दर्जाचे उपचार उपलब्ध होण्यासाठी हे पाऊल महत्त्वाचे ठरणार आहे.तसेच महाराष्ट्र सरकारने सोलापूरमध्ये एम्स उभे राहण्यासाठी मदत करण्यास तयार आहे. त्यामुळे सोलापूर हे एम्स प्रकल्पासाठी योग्य ठिकाण ठरेल, असेही शिंदे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे.
दरम्यान, मागील दहा वर्षांत सोलापूरचे विकास कामे बऱ्याच प्रमाणात रखडले होती. भाजपच्या खासदारांकडून सोलापूरच्या विकासासाठी फारसे प्रयत्न झाले नाहीत, असा आरोप होत आहे. मात्र, प्रणिती शिंदे यांनी खासदार पद मिळाल्यापासून सोलापूरच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या पाठपुराव्यामुळे सोलापूरच्या विकासाला नवी दिशा मिळणार आहे. त्याप्रमाणेच एम्स रुग्णालयाच्या खासदार शिंदे यांनी केलेल्या मागणीवर केंद्र सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद मिळेल, अशी अपेक्षा सोलापूरकरांनी व्यक्त केली आहे.