पाण्यात वाहून गेलेल्या तरुणाच्या शोध कार्याला पूर्णविराम
पाण्यात फुगलेल्या आणि कुजलेल्या अवस्थेत मिळाला मृतदेह
कासेगांव येथील नदीच्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यात वाहून गेलेले ज्ञानेश्वर कदम याचा मृतदेह शुक्रवारी सकाळी आढळला, पाण्यावर केवळ त्याचं डोकं दिसत असून उर्वरित मृतदेह पाण्यात होतं. घटनास्थळी उपस्थित असलेले तहसीलदार किरण जमदाडे, पोलीस फौजदार जाधव, त्यांचे सहकारी घटनास्थळावर उपस्थित होते. काटेरी झाडाच्या फांद्या कापून झाल्यावर फुगलेले अन् कुजलेले शव उत्तरीय सर्वोपचार रुग्णालयाकडे पाठविण्यात आले. ज्ञानेश्वर मृतावस्थेत मिळाल्याने गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या शोध कार्याला पूर्णविराम मिळालाय.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील कासेगांव परिसरात झालेल्या पावसामुळे कासेगांव-उळेगांव रस्त्यावर नदीवर पूलावर आलेल्या पाण्यात मंगळवारी मध्यरात्रीनंतर एका दुचाकीवर पूल ओलांडत असलेले तिघे जण पुराच्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेले गेले होते.
ज्ञानेश्वर संभाजी कदम, बबन संदीपान जाधव आणि महादेव राजकुमार रेड्डी अशी त्यांची नावे होती, त्यापैकी बबन जाधव आणि महादेव रेड्डी यांनी ओढा प्रवाहातील झाडांना पकडून स्वतःला वाचविले, मात्र ज्ञानेश्वर कदम सकाळपर्यंत मिळून आला नसल्याने बुधवारी सकाळपासून सोलापूर महानगरपालिका अग्निशमन दलाचे जवान आणि पंढरपुराहून मागविलेली होडी त्याचा शोध घेत होते.
या दुर्घटनेची माहिती मिळताच अक्कलकोट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी कासेगांव येथील घटनास्थळाला भेट दिली. या भेटीत गावकऱ्यांनी आमदार कल्याणशेट्टी यांच्यासमोर नदीवरील पूल चुकीच्या पद्धतीने बांधला, पूल पाच-सहा फूट खड्ड्यात गेल्याची तक्रार मांडली.
त्यावेळी सचिन कल्याणशेट्टी यांनी पूल पुरेशा उंचीवर बांधण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू आणि निधी उपलब्ध करून देऊ, अशी ग्वाही दिली. खासदार प्रणिती शिंदे यांनी ग्रामस्थांशी बोलून ज्ञानेश्वर कदम यांच्या शोधासाठी प्रशासन स्तरावर होत असलेल्या प्रयत्नावर चर्चा केली. त्यानंतर शोधासाठी होत असलेल्या कार्यासंबंधी त्या जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याशीही बोलल्या.
खासदार प्रणिती शिंदे यांनी कदम कुटुंबीयांना दिलासा देताना, शासन स्तरावरून जी मदत करता येईल, ते करू असेही ग्रामस्थांना आश्वासन दिले. नव्याने पूल बांधताना संबंधित ठेकेदार आणि इंजिनीयर यांच्या निष्काळजीपणामुळे पुलाचे काम चुकीच्या पद्धतीने झाले असून उभयतावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, अशीही मागणी गावकऱ्यांतून करण्यात आली.
नदीवरील पुलावर आलेल्या पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वर चा बुधवारी दिवसभर अग्निशमन दलाचे जवान व पंढरपुराहून आलेल्या होडी व जलतरणपटूंच्या शोधकार्याचा दिवस संपला, मात्र तो मिळून आला नाही. तहसीलदार किरण जमदाडे, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, सरपंच यशपाल वाडकर, सहाय्यक फौजदार रशीद बाणेवाले, उपसरपंच रोकडे घटनास्थळीच होते. सूर्यास्तानंतर अंधार पडू लागल्याने पहिल्या दिवसाची शोध मोहीम अपूर्ण राहिली.
दुसऱ्या दिवशी गुरुवारी पाणी ओसरू लागले होते, त्यातच शोधकार्य सुरू झाले, गुरुवारचा दिवसभर त्यास शोधत नदी प्रवाहाने ऊळे गांवच्या शिवारापर्यंत गेले. सायंकाळी सूर्य अस्ताकडे गेल्यावर तो मिळून न आल्याने शोधकार्य उन्हात थांबविण्यात आले.
शुक्रवारी सकाळी जवळपास पाणी पूर्णपणे ओसरलेले होते. सकाळी नदीचे पात्र तपासत असताना पाण्यातील काटेरी झाडांच्या फांद्याच्या गर्दीत त्याचे डोके दिसून आले. त्यावरून त्याचं शव तेथे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तहसीलदार किरण जमदाडे, ग्रामसेवक बाळासाहेब चौगुले, गाव कामगार तलाठी आरीफ हुडेवाले, पोलीस फौजदार जाधव, त्यांचे सहकाऱ्यांनी तो मृतदेह बाहेर काढण्यासाठी काटेरी झाडांच्या फांद्या पेट्रोल कटरने कापून घेतल्या.
त्यानंतर जहांगीर उर्फ लादेन आणि इतरांनी ज्ञानेश्वर चा पाण्यात फुगलेला आणि कुजलेला मृतदेह बाहेर काढला. तो मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सर्वोपचार रुग्णालयाच्या शवविच्छेदन विभागाकडे पाठवण्यात आल्यावर गेल्या तीन दिवसापासून पाण्यात वाहून गेलेल्या ज्ञानेश्वरच्या शोध कार्याला पूर्णविराम मिळालाय.