अपहरण करून खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेतील आरोपीस जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथून जामीन मंजूर….

वरील प्रकरणात दिनांक २४/१२/२०२३ रोजी फौजदार चावडी पोलीस स्टेशन अंतर्गत भा.द.वी कलम ३६४(A),३९२,३४१,५०६ आणि ३४ प्रमाणे आरोपीं रोहित अंकुश काटकर याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. यामध्ये फिर्यादी हा दिनांक २३/१२/२३ रोजी सकाळी ६ सुमारास वसंत विहार येथून मोटरसायकलने जिमला जात असताना कारंबा नाका जवळ अज्ञात इसमानी त्याची गाडी थांबवली होती. त्यानंतर फिर्यादीचे गाडीची चावी तसेच त्याचा मोबाईल काढून घेतला होता आणि जबरदस्तीने त्याला गाडीवर बसवून देशमुख-पाटील वस्तीचे पुढे एका ब्रिज जवळ घेऊन गेले होते आणि त्याच्या मोबाईल मधून फोन- पे वर २००००/- रुपये ट्रान्सफर करून घेतले होते. त्यानंतर फिर्यादीचे वडिलांच्या फोनवर संपर्क साधून पैसे न दिल्यास फिर्यादीला मारून टाकण्याची धमकी देण्यात आली होती. अशा आशयाची फिर्याद संबंधित पोलीस स्टेशन येथे दाखल करण्यात आली होती. यातील अटकेतील आरोपी रोहित काटकर यांनी आपला जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केला होता. वरील प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती रेखा पांढरे यांनी आरोपीचा जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे. यात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड. निलेश कट्टीमनी,ॲड. सोहेल रामपुरे यांनी काम पाहिले.