आम्ही शिंदेंसोबत जाण्यास तयार, पण… – प्रकाश आंबेडकर
राज्याच्या राजकारणात सध्या वेगवेगळ्या पक्षांमधील नेत्यांच्या गाठीभेठी जोरात सुरू आहेत. आगामी लोकसभा, विधानसभा व पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या भेटीगाठी वाढल्या आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली. वंचित बहूजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हेदेखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना भेटत असतात. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आपण का भेटत असतो?, यावर प्रकाश आंबेडकर यांनी महत्त्वाचे विधान केले आहे.
लोकांची कामे करण्यासाठी भेटावे लागते
आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमची युती आहे. आम्ही एकनाथ शिंदे यांच्यासोबतही जाण्यास तयार आहोत. एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे लोकांची कामे करण्यासाठी त्यांना भेटावेच लागते. या भेटीचा वेगळा अर्थ काढण्यची आवश्यकता नाही. ठाकरे गट किंवा शिंदे गट कोणासोबतही बसायला आम्ही तयार आहोत. मात्र, भाजपसोबत आमचे कधीच जमणार नाही. एकनाथ शिंदे यांनी भाजपची साथ सोडली तरच शिंदेंसोबत आम्हाला बसता येईल.
दरम्यान, स्वातंत्र्यवीर सावरकरांची 140वी जयंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दिल्लीच्या नवीन महाराष्ट्र सदनामध्ये साजरी करण्यात आली. मात्र, कार्यक्रमासाठी सदनाच्या दर्शनी भागात ठेवलेल्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा हटवण्यात आला होता. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळांनी शिंदे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. महाराष्ट्र सदनातील सावित्रीबाई फुले आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे पुतळे हटवण्याची हिंमत होते कशी?, असा संतप्त सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी राज्य सरकारला केला आहे. तसेच, ज्या अधिकाऱ्यांनी हे निर्बुद्धपणाचे काम केले आहे, त्यांच्यावर तातडीने कारवाई करा, अशी मागणीही छगन भुजबळांनी केली आहे.
छगन भुजबळांनीच राजीनामा द्यावा
यावर बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले, महाराष्ट्र सदन प्रकरणात छगन भुजबळांनीच राजीनामा द्यायला हवा. कारण छगन भुजबळ स्वत:ला ओबीसींचे नेते म्हणवतात आणि महाराष्ट्र सदन त्यांनीच बांधले आहे. आता ओबीसींचा अपमान झाला म्हणून छगन भुजबळांनी राजीनामा द्यायला हवा. तसेच, सावित्रीबाई फुले ,अहिल्याबाई होळकर आरएसएसच्या खिजगणतीतही नाही, अशी टीकाही प्रकाश आंबेडकरांनी केली.