कोण संजय राऊत? मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं -अजित पवार
कोण संजय राऊत? मी कोणाचंही नाव घेतलं नव्हतं. मी माझ्या पक्षासंदर्भात बोललो होतो, असे वक्तव्य विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शुक्रवारी पुण्यात केले.
पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कामाचा आढावा घेतला. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. त्यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊतांना पुन्हा एकदा टोलाच लगावला आहे.
नक्की प्रकरण काय?
तुम्ही सांगितल्यानंतरही संजय राऊत सल्ले देत आहेत, असा प्रश्न अजित पवारांना विचारण्यात आला. त्यावर त्यांनी कोण संजय राऊत, मी माझ्या पक्षाच्या संदर्भात बोललो असल्याने कोणाला लागायचे काहीच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले. राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांवर भाजप दबाव टाकत आहे. तपास यंत्रणांचा वापर करून भाजप फोडाफोडीचे राजकरण करत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला होता. त्यावर तुम्हाला आमचे वकीलपत्र घेण्याची काय आवश्यकता आहे. आमची बाजू मांडण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. आमच्या पक्षात जेष्ठ प्रवक्ते आहेत. ते आमची भूमिका मांडतील, असा पलटवार अजित पवारांनी केला होता. त्यानंतर आज पुन्हा अजित पवारांनी कोण संजय राऊत असे म्हणल्याने अजित पवार आणि संजय राऊत यांच्यातील वाद वाढण्याची शक्यता आहे.
मला बैठकीचे निमंत्रण नाही
पुण्यात अजित पवार यांनी जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या कामाचा आढावा घेतला. तसेच मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलावलेल्या बैठकीचे निमंत्रण नसून यावर सरकारने विरोधकांना विश्वासात घ्यायला हवे, असा सल्लाही अजित पवार यांनी दिला.
प्रशांतला माझ्या शुभेच्छा
फेब्रुवारी 2022 मध्ये निवडणुका होणार होत्या. त्यावेळी अनेक इच्छूकांनी तयारी केली. देव दर्शन केले. निवडणुका काही झाल्या नाहीत. आता सर्व इच्छूक कंटाळले आहेत. प्रशांत जगताप यांचे भावी खासदार असे बॅनर लागले आहेत. प्रशांतला माझ्या शुभेच्छा, असा टोला अजित पवार यांनी लगावला. निवडणुका होण्याची चिन्हे आहेत, या प्रश्नावर अजित पवार म्हणाले, मी निवडणूक अधिकारी नाही. जेव्हा निवडणूक अधिकारी होईन तेव्हा मी नक्की सांगेन की निवडणुका कधी होतील.