धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता सैनिक दलाची मानवंदना..!

भारतरत्न डॉ बाबासाहेब
आंबेडकर यांच्या विचारांचा समताधिष्ठित समाज घडवूया : डॉ. शिवाजी शिंदे
सोलापूर – दिनांक 14 ऑक्टोबर 1956 हा केवळ दिनदर्शिकातील एक दिवस नव्हता तो भारतीय सामाजिक इतिहासातील एका महान परिवर्तनाचा दिवस होता. त्या दिवशी नागपूरच्या दीक्षाभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भगवान गौतम बुद्धाच्या धम्माचा स्वीकार केला. त्यांच्यासोबत लाखो अनुयायांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. हा केवळ धर्मांतराचा सोहळा नव्हता. तो आत्मसन्मानाचा उदघोष होता. तो केवळ धार्मिक विधी नव्हता. तो सामाजिक विषमतेविरुद्धचा वैचारिक उठाव होता. तो केवळ एका व्यक्तीचा निर्णय नव्हता. तो मानवी प्रतिष्ठा, समता, विवेक आणि बंधुता यांच्यावर आधारलेल्या समाज निर्मितीचा संकल्प होता. म्हणून आज 70 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त आपण सात संकल्प करून भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा समताधिष्ठित समाज घडूवूया, असे आवाहन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
समता सैनिक दल, सोलापूर जिल्ह्याच्या वतीने आयोजित धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ध्वजारोहण सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून ते मंचावर उपस्थित होते. त्यांच्या हस्ते नोर्थकोट प्रशालेच्या मैदानावर ध्वजारोहण झाले. त्यांनी धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्व अनुयायांना शुभेच्छा दिल्या. यानंतर समता सैनिक दलाचे संचलन संपन झाले.या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी एकूण सात संकल्प करण्याची विनंती त्यांनी केली.
त्यामध्ये प्रत्येक कुटुंबात वाचनाची सवय, गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत, भेदभाव मुक्त व्यवहार, विवेकपूर्ण संवाद, संविधानिक मूल्यांचा आदर, करूणेची कृती आणि स्वतःचे आत्मपरीक्षण असे सात संकल्प यादिनी प्रत्येकाने करावेत असे आवाहन आपल्या मनोगतातून डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले.
नॉर्थकोट प्रशाला ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत संचलन होऊन डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी समता सैनिक दलाचे जी ओ सी शांतिकुमार कांबळे, रमेश सुतकर,बाळासाहेब भोसले,अण्णासाहेब भालशंकर, विठ्ठल थोरे, अंगद जेटीथोर, महासचिव बाळासाहेब मस्के, कार्याध्यक्ष अनिल जगझाप, वसिष्ठ सोनकांबळे,मुकुंद चंदनशिवे,सुनिल डांगे,सुमित्रा केरु जाधव, सुनिता गायकवाड, सुचित्रा थोरे, चंदकांत कोळेकर, सुधीर चंदनशिवे,अरुण गायकवाड,संभाजी तळभंडारे, आनंद शिंदे,प्रमोद जाधव, विनोद जाधव, रत्नदीप कांबळे, कुणाल जानराव, शाहू दावणे, अंकुश बनसोडे, पायाळ सर, ज्ञानेश्वर प्रक्षाळे, बाळू शिवशरण, मारूती शिवशरण,संभाजी जौंजट, दिपक नागटिळक,बाळासाहेब थोरात, चित्तरंजन सातपुते, सूरज प्रक्षाले, सम्राट प्रक्षाले, प्रा.वनिता चंदनशिवे,वर्षा जाधव, प्रिती जाधव, आशालता आव्हाड, वैशाली उबाळे, इत्यादी सैनिक उपस्थित होते.
प्रास्तविक मनोगत जी ओ सी शांतिकुमर कांबळे यांनी केले, सूत्रसंचालन वसिष्ठ सोनकांबळे यांनी केले तर अण्णासाहेब भालशंकर यांनी सर्वांचे आभार मानले.



