महाराष्ट्र

नई जिंदगीतील हुसेन कुमसी कडे सापडले 2 पिस्तूल अन् 4 जीवंत काडतुसे…

सोलापुरात बेकायदेशीर शस्त्र बाळगणाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. गावठी पिस्तूल विक्रीसाठी आल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून एका ४१ वर्षीय आरोपीला अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्तूल, चार जिवंत काडतुसे आणि मोटारसायकल असा एकूण १ लाख २२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

हुसेन अहमद मकबूलसाब कुमसी (वय ४१, रा. शिवगंगा नगर, नई जिंदगी, सोलापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

१९ ऑक्टोबर रोजी विमानतळाच्या पाठीमागील रस्त्यावरून सिद्धेश्वर साखर कारखान्याकडे जाणाऱ्या ८० फूट रस्त्यावरील सनराईज शाळेसमोरील मोकळ्या मैदानात एक इसम गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख यांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत सापळा रचला.

सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संशयित हुसेन कुमसी याला मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. त्याची झडती घेतली असता कमरेला एक गावठी पिस्तूल, पॅन्टच्या खिशात चार जिवंत काडतुसे आणि मोटारसायकलच्या डिक्कीत आणखी एक गावठी पिस्तूल आढळले. शस्त्र बाळगण्याचा परवाना नसल्याचे निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

तपासात ही पिस्तूल आणि काडतुसे पुणे येथील ओळखीच्या व्यक्तीकडून विकत घेतल्याचे आरोपीने सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यामुळे ही शस्त्रे नेमकी कुठून आणली, ती कोणाला विकली जाणार होती आणि या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

विशेष म्हणजे, आरोपीविरुद्ध यापूर्वी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन, तर जेलरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा एक, असे एकूण तीन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त प्रितम यावलकर, सहायक पोलीस आयुक्त अरुण देवकर तसेच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख आणि गुन्हे प्रकटीकरण पथकाने ही कामगिरी केली.

अवैध शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या साखळीपर्यंत पोहोचण्याचे पोलिसांसमोर आव्हान असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अल्फाज शेख करीत आहेत.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel