सोलापूर बातमीखेळ

पत्रकारांच्या लेखणीतील स्पर्धा आता थेट क्रिकेटच्या मैदानावर

खा. धैर्यशील माने; ‘लोकनाथ’ चषक ट्रॉफीचे दिमाखात अनावरण

सोलापूर: राजकारणात स्पर्धा असते, मात्र ती नेहमीच खिलाडूवृत्तीने होत नाही. पत्रकार मात्र लेखणीतील स्पर्धेबरोबरच क्रिकेटच्या मैदानावरही खेळाडूवृत्तीचे दर्शन घडवतील आणि ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ही स्पर्धा यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास शिवसेनेचे संपर्कप्रमुख तथा खासदार धैर्यशील माने यांनी व्यक्त केला.

राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सेवालय फाउंडेशनचे अध्यक्ष मनिष काळजे यांच्या सहकार्याने पत्रकार बांधवांसाठी १२, १३ व १४ जून रोजी रेल्वे मैदान, सोलापूर येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ स्पर्धेच्या ट्रॉफीचे अनावरण शनिवारी सकाळी सोलापूर श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात उत्साहात पार पडले. यावेळी खासदार माने बोलत होते. यावेळी राज्यसभेच्या खासदार प्रा. डॉ.ज्योती वाघमारे, शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख मनिष काळजे, ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, नगरसेवक प्रियदर्शन साठे, ज्ञानेश्वर सपाटे, सोलापूर श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, खजिनदार किरण बनसोडे, डिजिटल मीडिया असोसिएशनचे विजयकुमार बाबर, संघाचे उपाध्यक्ष अफताब शेख, आदी उपस्थित होते.

खासदार माने म्हणाले, ‘‘पत्रकारांमध्ये लेखणीच्या माध्यमातून स्पर्धा असते. आता हीच स्पर्धा क्रिकेटच्या मैदानावर पाहायला मिळणार आहे. पत्रकार बांधव ही स्पर्धा निश्चितच खिलाडूवृत्तीने पार पाडतील. पत्रकारांसाठी अशा आगळ्यावेगळ्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन केल्याबद्दल काळजे यांचे अभिनंदन करतो आणि सर्व सहभागी संघांना शुभेच्छा देतो.

काळजे यांनी सांगितले की, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त वर्षभर विविध सामाजिक, सांस्कृतिक, कला आणि क्रीडा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. ‘लोकनाथ’ मीडिया चषक हा त्याचाच एक भाग असून पत्रकारांमध्ये एकोपा आणि स्नेह वाढावा, हा या स्पर्धेमागील उद्देश आहे. या स्पर्धेत लोकमत, संचार, दिव्य मराठी, सकाळ, तरुण भारत संवाद, डिजिटल मीडिया, सोलापूर श्रमिक पत्रकार संघ, राज्य मराठी पत्रकार संघ आणि मेट्रो सोलापूर या संघांनी सहभाग नोंदविला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आप्पासाहेब पाटील यांनी केले.

फोटो ओळ : ‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ च्या ट्रॉफीचे अनावरण करताना शिवसेनेचे संपर्कप्रमुख खा. धैर्यशील माने, राज्यसभेच्या खा. ज्योतीताई वाघमारे, जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, सेवालय फाउंडेशनचे प्रमुख तथा जिल्हाध्यक्ष मनिष काळजे, पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे व अन्य मान्यवर.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel