प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे. त्यांना भाजपकडे घेऊन जातो – रामदास आठवले
प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत यावे. त्यांना भाजपकडे घेऊन जातो. उद्धव ठाकरेंकडे काही मिळणार नाही. त्यामुळे आपण भाजपसोबत राहू, अशी खुली ऑफर रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी दिली आहे. ते शिर्डीमध्ये बोलत होते.
शिर्डीमध्ये रिपाइंचे राज्यस्तरीय अधिवेशन झाले. यावेळी त्यांनी हे आवाहन केले. आता यावर प्रकाश आंबेडकर काय प्रतिक्रिया देतात, याची उत्सुकता आहे.
ठाकरे कसे माहित
रामदास आठवले म्हणाले की, उद्धव ठाकरे कसे आहेत, ते मला माहित आहे. आता त्यांनीही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत राहू नये. ते आणि प्रकाश आंबेडकर भाजपसोबत आले, तर त्यांचे स्वागतच असेल. प्रकाश आंबेडकर तर आमचे नेते, पण रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ज्यांच्या बाजूने असते, सत्ता त्यांना मिळते. हे ध्यानात घेता प्रकाश आंबेडकरांनी माझ्योसोबत यावे.
आघाडीकडून सुरू लूट
प्रकाश आंबेडकरांना मी भाजपकडे नेईन. आपण नरेंद्र मोदी आणि भाजपसोबत राहू. उद्धव ठाकरे यांच्याकडे त्यांना काही मिळणार नाही. सारे भाजपकडे मिळेल, असे आवाहन त्यांनी केले. तर दुसरीकडे त्यांनी महाविकास आघाडी दाखवतेय वज्रमूठ, रोज करतेय सगळ्यांची लूट, असे म्हणत टीका केली.
पक्षातून बाहेरचा रस्ता
रामदास आठवले यांनी यावेळी कार्यकर्त्यांना खडेबोल सुनावले. तुमच्या बेशिस्तपणामुळे पक्षाचा सत्यानाश झाला. नुसते फोटो काढून, स्टेजवर गर्दी करून, घोषणाबाजी करून पक्ष वाढणार नाही. प्रसंगी अशा लोकांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.