मला फसवण्यासाठी सरकाराने परमबीर सिंह यांचा वापर केला – अनिल देशमुख
मला फसवण्यासाठी सरकाराने मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांचा वापर केला. त्याचे बक्षिस म्हणून त्यांचे निलंबन सरकारने मागे घेतले, असा आरोप राज्याचे माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी केला आहे.
आज राष्ट्रवादीची बैठक
आज मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बैठक आहे. यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते मुंबईत दाखल झाले आहेत. बैठकीत आगामी निवडणुकांची रणनिती व इतर महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात येणार. या बैठकीत सहभागी होण्यापूर्वी अनिल देशमुख यांनी माध्यमांशी संवाद साधला.
सरकारकडून परमबीर सिंहांचा वापर
अनिल देशमुख म्हणाले, आता राज्यात जे सरकार आहे, त्या सरकारनेच मला फसवण्यासाठी परमबीर सिंह यांचा वापर केला. याचे बक्षिस म्हणून नंतर त्यांचे निलंबन मागे घेतले. आज राष्ट्रवादीच्या कोअर कमिटीच्या बैठकीत हा मुद्दा मी उचलणार आहे. त्यानंतर पत्रकार परिषदेत यावर सविस्तर भूमिका मांडेल.
नाना पटोलेंचा फडणवीसांवर आरोप
दरम्यान, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही याप्रकरणाबाबत देवेंद्र फडणवीस व भाजपवर निशाणा साधला आहे. नाना पटोले यांनी म्हटले आहे की, परमबीर सिंह यांना देशमुखांच्या विरोधात प्यादे म्हणून वापरले गेले. फडणवीसांनी आणि केंद्र सरकारने महाराष्ट्राला बदनाम करण्यासाठी कट केला होता. त्यामुळेच सरकारने तांत्रिकदृष्ट्या कॅटच्या फेऱ्यातून परमबीर सिंहला बाहेर काढले.
उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन नाही
नाना पटोले म्हणाले, परमबीर सिंह यांच्याआधी देवेंद्र फडणवीसांनीच गृहमंत्र्यांवर वसुलीचा आरोप केला होता. अनिल देशमुखांच्या प्रकरणात 100 कोटींचा हिशोब शेवटपर्यंत लागलाच नाही. ते आणले कुठून, हा प्रश्न तेव्हाही निर्माण झाला होता आणि परवा परमबीर सिंह यांच्या बाबतीत देण्यात आलेल्या आदेशात उच्च न्यायालय आणि कॅटच्या आदेशाचेही पालन करण्यात आले नाही.
परमबीर सिंहांचे निलंबन का झाले होते?
माजी गृहमंत्री अनिल देशमूख यांच्यावर भ्रष्ट्राचाराचे आरोप करणारे मुंबईचे माजी पोलिस आयुक्त यांचे निलंबन शिंदे-फडणवीस सरकारने मागे घेतले आहे. परमबीर सिंह यांचे पोलिस दलातील बेशिस्त वर्तवणूक आणि अनियमितता यासाठी ही कारवाई करण्यात आली होती. तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या कार्यकाळात परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली होती. तत्पूर्वी तत्कालिन राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नियमांचे उल्लंघन करणाऱ्या परमबीर सिंह यांच्यावर निलंबनाची कारवाई केली जाईल असे सांगितले होते.