“महिलांचे सर्वांगीण आरोग्य हीच खरी कुटुंबाची ताकद” – डॉ. वर्षा डोईफोडे

जिल्हा रुग्णालय सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांच्या आरोग्यासाठी सुरू करण्यात आलेल्या “रोटरी आदिशक्ती पिंक क्लिनिक” या विशेष उपक्रमाचा लोकार्पण सोहळा सोमवार, दि. 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता उत्साहात पार पडला.
हा उपक्रम माननीय जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या संकल्पनेतून आणि रोटरी क्लबच्या सहकार्याने साकार झाला असून, कार्यक्रम प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल व डॉ. वर्षा डोईफोडे यांच्या हस्ते संपन्न झाला.
यावेळी मंचावर डॉ. अग्रजा वरेरकर, डॉ. जयश्री ढवळे, अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज च्या अधिष्ठाता डॉ. माधवी रायते, सौ. पारूल पटेल, जयेश पटेल, धनश्री केळकर, निलेश फोफलिया, संदीप जव्हेरी आदी मान्यवर उपस्थित होते. तसेच डॉ. श्रीकांत कुलकर्णी, डॉ. चंद्रकांत क्षीरसागर, डॉ. रोहन वायचळ यांचीही उपस्थिती लाभली. कार्यक्रमास गौरीताई टिळक विद्यापीठ नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थिनी, सुरवसे प्रशाला येथील विद्यार्थिनी व आशा मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
यावेळी उपस्थित मान्यवरांमध्ये झुबिन अमेरीया, डॉ. राजीव प्रधान, शिवाजी उपरे, सुनील माहेश्वरी, निशांत डाग, मितेश पंचमीया, संतोष कणेकर, संजय मडूर, पराग कुलकर्णी, आशिष मेहता, शांता येळंबकर, जयश्री चव्हाण, लता चन्ना, स्वाती मनसावले, जान्हवी मखिजा, आसावरी सराफ, कमल जाजू, प्रांजल डागा, सरिता फोफलिया आदींची उपस्थिती होती.
महिलांच्या आरोग्यासाठी एकाच छत्राखाली सेवा
“रोटरी आदिशक्ती पिंक क्लिनिक” अंतर्गत महिलांमध्ये आढळणारे कर्करोग, अॅनिमिया, रजोनिवृत्ती (Menopause), उच्च रक्तदाब, मधुमेह आदी आजारांचे निदान व उपचार एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. किशोरावस्थेपासून ते रजोनिवृत्तीपर्यंत महिलांच्या शारीरिक, मानसिक आणि हार्मोनल बदलांचा विचार करून ही संकल्पना राबविण्यात येत आहे.
आपल्या मनोगतात डॉ. वर्षा डोईफोडे म्हणाल्या,
“घरातील स्त्री आरोग्यसंपन्न असेल तर संपूर्ण कुटुंब सक्षम राहते. महिलांचे वेळेत निदान व उपचार व्हावेत यासाठी हे पिंक क्लिनिक महत्त्वाची भूमिका बजावेल.”
डॉ. माधवी रायते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना पिंक हेल्थ- (सुदृढ आरोग्य) बाबत मार्गदर्शन केले. महिलांनी स्वतःच्या आरोग्यासाठी कोणत्याही प्रकारचा संकोच न बाळगता स्वतः पुढाकार घ्यावा असे आव्हान देखील केले.
महाराष्ट्रातील पहिला उपक्रम
हा उपक्रम महाराष्ट्रात प्रथमच सोलापूर येथे सुरू करण्यात आला असून रोटरी जिल्हा 31,32 अंतर्गत येणाऱ्या नांदेड, संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, जालना, बीड, परभणी आदी 11 जिल्ह्यांत स्थानिक रोटरी क्लबच्या सहकार्याने अशाप्रकारची केंद्रे सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रांतपाल नियुक्त जयेश पटेल यांनी दिली.
हा प्रकल्प पी.पी. पटेल फाउंडेशन यांच्या सीएसआर निधीतून साकारण्यात आला आहे.
महिलांना आवाहन
“सशक्त नारी, सशक्त भारत” या ब्रीदवाक्यानुसार महिलांनी या अभिनव उपक्रमाचा अधिकाधिक लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा रुग्णालय सोलापूर व रोटरी क्लब ऑफ सोलापूर यांच्या वतीने करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.ऐश्वर्या सातपुते यांनी केले



