रमजान ची 10 दिवसांची तरावीह नमाज पूर्ण…
पहिला अशरा झाला पूर्ण

सोलापूर:पवित्र रमजान महिना सुरू होऊन मंगळवारी दिवस पूर्ण होत आहेत.मात्र, या महिन्यात रात्री पठण केली जाणार्या विशेष नमाजला (तरावीहला) सोमवारीच 10 दिवस पूर्ण झाले. या दहा दिवसांच्या काळालाच पहिला अशरा म्हटले जाते. त्यामुळे शहरातील काही मशिदींमध्ये सोमवारी दहा दिवसाच्या तरावीहमध्ये दर तरावीहला 3 पारे प्रमाणे संपूर्ण कुरआन मधील 30 पारे पठण करण्यात आले.
शहरातील व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, उमराह आदी प्रवासावर जाणार्या व्यक्तींचा तीन पारेंची तरावीह नमाज पठण करण्यात मोठय़ा प्रमाणात सहभाग असतो .
अचिव्हर्स हॉल नं.2 येथे 10 दिवसाची तरावीह नमाज पठण पूर्ण झाली.यावेळी हाफिज मोहम्मद अशहद आणि मौलाना इज्जुद्दीन सिद्दीकी यांनी कुराण पठण पूर्ण केले.यासाठी मैनोद्दीन शेख यांचे मोलाचे सहकार्य लाभले.तसेच दुआ मौलाना सादुद्दीन कासमी यांनी मागितली.
रमजानपासून ईदच्या खरेदीस बाजारपेठेत सुरुवात होत असल्याने या व्यापार्यांना तरावीहची नमाज पठण करण्यास अडचण येते. त्यासाठी पहिल्या दहा दिवसातील तरावीहमध्ये संपूर्ण कुरआन पठण केले जाते. प्रत्येक तरावीहमध्ये 3 याप्रमाणे कुरआनमधील 30 पारे दहा दिवसांत पूर्ण करण्यात येते. रात्री 8.30 च्या इशाच्या नमाजनंतर तरावीहच्या नमाजला सुरुवात होते. रात्री 10.30 च्या नंतर तरावीहची नमाज संपते. याशिवाय शहरातील बहुसंख्य मशिदीमध्ये एक आणि देान पारे प्रमाणे पूर्ण महिनाभर नमाजे तरावीह पठण करण्यात येत आहे.
इस्लाम धर्मात रमजान महिन्याचे तीन भाग पाडलेले आहेत. त्याप्रमाणे दहा दिवसांना अशरा म्हटले जाते. पहिला अशरा रेहमत (कृपा), दुसरा अशरा मगफीरत (माफी) आणि तिसरा अशरा जहन्नम (नर्क)पासून निजात (सुटका) मानण्यात येते.
याप्रमाणे मुस्लिम बांधव या तिन्ही अशरांत इबादत करून शेवटच्या अशरामध्ये गोरगरीब नातेवाईक, अनाथ तसेच विधवांना जकात आणि सदका (दानधर्म) वाटप करतात.