मी नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे बोललोच नव्हतो – अभिजित पाटील

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यापुढे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचेच काम जोमाने करणार आहे. मी नाईलाजाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला, असे बोललोच नव्हतो, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यानी नोंदवले.
रविवारी विठ्ठल कारखान्यावर झालेल्या बायो सीएनजी प्रकल्पाच्या भूमिपूजनानिमित्त झालेल्या शेतकरी मेळाव्यात राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांच्या उपस्थितीत कारखान्याचे अध्यक्ष अभिजित पाटील यानी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी श्री पाटील याना प्रवेश करण्यास भाग पाडले, अशा स्वरूपाच्या बातम्या माध्यमांनी प्रसारित केल्या.
त्या अनुषंगाने बोलताना अभिजित पाटील म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर आपण जाहीरपणे भाषणही केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी आपल्याला उमेदवारी देण्यासंदर्भात सुद्धा सूचक वक्तव्य केले आहे. यामुळे माझ्या सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह वाढला आहे. पुढील काळात आपण मोठ्या नेटाने काम करून राष्ट्रवादी पक्षाचा बालेकिल्ला मजबूत करू, असे त्यांनी सांगितले.