शस्त्राचा धाक दाखवून चोरी करणारे आरोपी पोलिसांकडून जेरबंद, एक लाखांचा मुद्देमाल जप्त
महामार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शस्त्राचा धाक दाखवून लुटमारी करणाऱ्या तीन आरोपींना पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्या ताब्यातून एक लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
याप्रकरणी मोहित भिकूलाल भंडारी( रा.सिल्लोड, संभाजीनगर ),अमोल विठ्ठल कुमावत (रा. सिल्लोड, संभाजीनगर), इफ्ताकार नईम शेख (रा.संभाजीनगर )या तीन आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे. या प्रकरणी मोहम्मद कुरेशी यांनी तक्रार दाखल केली आहे.
नक्की काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , 30 मार्च रोजी पहाटे पाच वाजता मोहम्मद अब्दुल रहीम कुरेशी हे गाडी चालक शेख इफ्तेकार याच्यासह आठ लाख रुपये घेऊन कापड खरेदी करण्यासाठी बुलेरो पिकप गाडी घेऊन जात होते. मोरगाव -निरा जाणारे रस्त्यावर बारामती, पुणे गावाच्या हद्दीत ते आले असताना, तीन अज्ञात आरोपींनी त्यांच्या ताब्यातील पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडीने कुरेशी यांची पिकप गाडीस जबरदस्तीने थांबवले. त्यानंतर चाकूचा, कोयात्याचा धाक दाखवून जबरी चोरी करून गाडीतील रोख आठ लाख सात हजार रुपये व मोबाईल घेऊन आरोपी पसार झाले होते.
याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी गुन्ह्याचा तांत्रिक विश्लेषणावरून व गोपनीय बातमीदार मार्फत माहिती काढून आरोपींचा माग काढला असता, ते सिल्लोड या ठिकाणी राहत असल्याची माहिती मिळाली.
तीन जणांना अटक
पोलिसांचे पथक सिल्लोड याठिकाणी जाऊन त्यांनी आरोपींचा शोध घेत तीन जणांना अटक केली आहे. आरोपी इफ्ताकर नईम शेख याच्या ताब्यातून एक लाख रुपये पोलिसांनी हस्तगत केले आहे. न्यायालयात आरोपींना हजर केले असता, दहा एप्रिल पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. गुन्ह्याचा पुढील तपास वडगाव निंबाळकर पोलिस करत आहे.