महाराष्ट्रराजकीय

शहरच नव्हे तर तालुका, जिल्हाही छत्रपती संभाजीनगर होणार : देवेंद्र फडणवीसांची माहिती

केवळ औरंगाबाद शहराचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आलेले नाही, तर तालुका, जिल्ह्याचेही नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्यात आले आहे. त्याबाबत केवळ औपचारिकता बाकी आहे. सोमवारपर्यंत याबाबतची प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

नामांतर शहराचे की जिल्ह्याचे?

नामांतर औरंगाबाद शहराचे आहे की, संपूर्ण जिल्ह्याचे? असा सवाल करत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे. या प्रश्नावर आज पत्रकार परिषदेत उत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकारने संपूर्ण औरंगाबाद जिल्हा, शहर, तालुक्याच्या नामांतराचा प्रस्ताव केंद्राला पाठवला होता. त्याला केंद्राने मंजुरी दिली आहे. त्यानुसार काल नोटीफीकेशन काढले आहे.

सोमवारी शासन निर्णय येईल

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले, शहरासोबतच पालिका, नगरपालिका, तालुका, जिल्ह्याचेही नामांतर करण्यात येईल. जिल्ह्याच्या नामांतराबाबत महसूल विभागाकडून शासन निर्णय जारी केला जाईल. तर, महापालिका, नगरपालिकेच्या नामांतरासंदर्भात नगरविकास विभागाकडून शासन निर्णय जारी करण्यात येईल. आज व उद्या सुट्टी असल्यामुळे या विभागांनी आतापर्यंत शासन निर्णय जारी केला नसेल. मात्र, सोमवारी याबाबतची प्रक्रिया शक्यतो पूर्ण होईल.

तसेच, औरंगाबाद व उस्मानाबादचे शहर, तालुका, जिल्हा, महापालिका, नगरपालिका या सर्वांचेच नाव बदलले आहे. याबाबत कुणीही संदिग्धता बाळगू नये, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

माझ्याकडे पुरावे

एकनाथ शिंदे यांच्या बंडावेळी उद्धव ठाकरे यांनी मला मुख्यमंत्रीपदाची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. त्यावरुन संजय राऊतांनी फडणवीसांवर टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, केवळ सनसनाटी निर्माण करण्यासाठी मी विधाने करत नाही. जे बोलतो, त्याबाबत माझ्याकडे पुरावे असतात.

मविआच्या पायाखालची वाळू सरकली

मविआ उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी पोटनिवडणुकीत भाजपकडून पोलिसांच्या मदतीने पैसे वाटले जात आहे, असा गंभीर आरोप केला आहे. तसेच, याविरोधात ते उपोषणालाही बसले आहेत. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले, पोटनिवडणुकीचा प्रचार आता संपला आहे. सध्या आचारसंहिता सुरू आहे. अशावेळली प्रचार करता येत नाही. त्यामुळेच असे स्टंट करुन प्रचार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. मविआच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यामुळे त्यांचे हे उपोषण भाजपविरुद्ध नाही, तर मतदारांविरुद्ध आहे. पैसे वाटण्याची संस्कृती आमची कधीही नव्हती.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel