सुप्रिया सुळे- प्रफुल्ल पटेल राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. खासदार सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांच्याकडे पक्षाच्या कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
महाराष्ट्राची जबाबदारी सुप्रिया सुळे यांच्याकडे
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजीनामा देण्याची घोषणा या आधी केली होती. त्यानंतर नाट्य घडले होते. त्याचवेळी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नावे चर्चेत होती. अखेर दोन कार्यकारी अध्यक्ष निवडण्यात आले असून यात सुप्रिया सुळे यांचा देखील समावेश आहे. सुप्रिया सुळे यांच्याकडे महाराष्ट्र, हरियाणा आणि पंजाब या राज्यांची जबाबदारी देण्यात आली आहे.
प्रफुल्ल पटेल यांनाही मोठी जबाबदारी
सुप्रिया सुळे यांच्याप्रमाणे प्रफुल्ल पटेल यांना देखील कार्यकारी अध्यक्ष पदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पटेल आधीपासूनच राष्ट्रीय कार्यकारीणत सक्रिय आहेत. मी सुरुवातीपासून काम करत आलो आहोत, त्यामुळे माझ्यासाठी ही जबाबदारी मोठी नसल्याचे पटेल यांनी म्हटले आहे. हे पद जरी नवीन असले तरी माझ्यासाठी हे काम तेच जुने असल्याचे पटेल म्हणाले.
अनेक राज्यात बदलाची स्थिती
देशात बदलायचे एक वातावरण तयार झाला आहे. नऊ वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी सत्तेत आले तेव्हा त्यांनी दिलेले सर्व आश्वासन पूर्ण होताना दिसत नाहीये. त्यामुळे देशातील जनता नाराज असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. यामुळे अनेक राज्यात बदलाची स्थिती असल्याचेही ते म्हणाले.
भाजपने लाच देऊन सत्ता ताब्यात घेतली
भारतीय जनता पक्षाच्या वतीने लाच देऊन मध्य प्रदेश मधील कमलनाथ यांच्या सरकारकडून सत्ता ताब्यात घेतली, असा आरोप शरद पवार यांनी केला. त्यामुळे विरोधी पक्षातील लोक एकत्र येऊन भाजपचा सामना केल्यास देशात बदल होईल, असा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.
कॉमन मिनिमम प्रोग्राम
देशातील जनता परिवर्तनासाठी तयार आहे. मात्र, त्यासाठी सर्वच पक्षाने एकत्र येऊन एखादा कॉमन मिनिमम प्रोग्राम आखण्याची आवश्यकता असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केलं. देशभरात आपण लोकांसमोर असा कार्यक्रम ठेवावा आणि त्यानंतर आपल्याला नक्कीच जनता संधी देईल, असे मत पवारांनी व्यक्त केले.