सोलापुरातील नामवंत पनाश अपार्टमेंटच्या संचालक अमीत थेपडे व त्यांच्या पत्नी विरुद्ध सव्वा कोटीची फसवणुकीच्या गुन्ह्यात जिल्हा न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
सोलापुरातील उच्चभ्रू गृहनिर्माण सोसायटी समजल्या जाणाऱ्या गॅलेक्सी पनाश मधील दुकान गाळा व २ प्लॉट देतो म्हणून फिर्यादी कडून वेळोवेळी १ कोटी २५ लाख एवढी रक्कम उकळून दुकान गाळा व प्लॉटही दिले नाहीत. तसेच पैसेही परत दिले नाहीत. याप्रकरणी जालोर गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे संचालक अमित थेपडे व मोनाली अमित थेपडे (रा.दोघे पुणे) यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
घटनेची हकीकत अशी की, पुण्यातील थेपडे दापत्यांनी गॅलोर डेव्हलपर्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची स्थापना करून येथे मजरेवाडी येथील जमिनीवर ‘ गॅलेक्सी पनाश’ नावाने रहिवासी प्लॉट, व्यापारी दुकान गाळे विक्री करण्याचा प्रकल्प उभा केला.या प्रकल्पातील दुकान गाळा क्रमांक २१ करिता शैलेंद्र किसन गायकवाड (रा.पिंपळे निलख,पुणे) या व्यवसायाकांनी थेपडे दापत्यांना ४५ लाख रुपये देऊन रजिस्टर साठे खत लिहून घेतले. त्यानंतर हा प्रकल्प जलद गतीने विकसित करण्यासाठी पुन्हा फिर्यादी कडून १५ लाख रक्कम घेतली. परंतु मुदतीत गाळा दिला नाही.फिर्यादीने रकमेची मागणी केली असता पुन्हा या दापत्यांनी फिर्यादीकडून आणखी ४ लाख ५८ हजार रुपये घेऊन गॅलेक्सी पनाश या प्रकल्पातील रहिवासी प्लॉट क्रमांक १२०१ व १२०२ असे दोन प्लॉट ६४ लाख रुपये ३१ डिसेंबर २०२२ पर्यंत दोन्ही रहिवासी प्लॉटचा ताबा देतो असे सांगून रक्कम उकळले.गायकवाड यांनी वारंवार गाळा द्या अथवा रक्कम द्या अशी मागणी केली असता, तुमची सर्व रक्कम व्याजासह परत देण्याचे आमिष दाखवून आणखी १९ लाख रुपयेची रक्कम घेतली. अशा पद्धतीने या दोघा दापत्याने फिर्यादी कडून ८३ लाख ५८ हजार एवढी रक्कम बँकेमार्फत स्वीकारून त्या बदल्यात प्लॉटचा ताबा दिला नाही. काही दिवसांनी पुन्हा आपली सर्व रक्कम १ कोटी २५ लाख ३० हजार एवढी रक्कम व्याजदरानुसार देतो असे पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नोटरीने लिहून देऊनही तसेच एका सहकारी को-ऑपरेटिव्ह बँकेचा न वटणारा धनादेश दिला. तो चेक वाटला नाही.आपली मोठी आर्थिक फसवणूक झाल्याचे लक्षात येताच शैलेंद्र गायकवाड यांनी थेपडे पती-पत्नीवर विजापूर नाका पोलीस ठाण्यात आर्थिक गुन्हा दाखल केला आहे. संबंधित संचालकांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे आपला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला होता .तदनंतर जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपींना दि. ०१/१०/२०२४ रोजी अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केले होते. त्यानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री.आर.जे.कटारिया यांनी आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज दि.२६/११/२४ रोजी सशर्त मंजूर केला आहे. वरील प्रकरणात आरोपींतर्फे ॲड.कदीर औटी, ॲड. दत्तात्रेय कापुरे, ॲड. निलेश कट्टीमणी, ॲड. वैभव बोंगे, ॲड ओंकार फडतरे यांनी काम पाहिले.