सोलापुरात 70-80 अतिक्रमण केलेले खोके जमीनदोस्त; मनपाची मोठी कारवाई, कडेकोट पोलीस बंदोबस्त

सोलापूर : शहरात आज सोमवारी सकाळी सोलापूर पोलीस मुख्यालयालगत भिंतीलगत उभारण्यात आलेले सुमारे ७० ते ८० अतिक्रमित खोके सोलापूर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने जमीनदोस्त केले. पहाटेपासूनच कारवाईला सुरुवात करण्यात आली होती.
या कारवाईदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी, जेसीबी यंत्रणा आणि पोलीस दलाच्या उपस्थितीत अतिक्रमणे हटविण्यात आली.
सदर ठिकाणी अनेक दिवसांपासून अनधिकृतपणे खोके उभारण्यात आले होते. वाहतूक कोंडी, सुरक्षेचा प्रश्न आणि सार्वजनिक जागेचा अडथळा निर्माण होत असल्याच्या तक्रारी प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार नियोजनबद्ध कारवाई करण्यात आली.
दरम्यान, कारवाईमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते; मात्र पोलिसांच्या दक्षतेमुळे परिस्थिती नियंत्रणात राहिली. महापालिकेकडून पुढील काळातही शहरातील अतिक्रमणांविरोधात मोहिम सुरू ठेवण्याचा इशारा देण्यात आला आहे.



