सोलापूरमध्ये या पार्टीची चर्चा ; रियाज हुंडेकरी यांनी काय केलं पहा…

रमजान महिन्याच्या पवित्र पार्श्वभूमीवर सामाजिक ऐक्य, बंधुता आणि सौहार्दाचा संदेश देत रियाज हुंडेकरी मित्रपरिवारतर्फे आयोजित करण्यात आलेली भव्य रोजा इफ्तार पार्टी शहरात विशेष चर्चेचा विषय ठरली. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी, नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने हा कार्यक्रम सर्वधर्मसमभावाचे प्रतीक ठरला.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्रणिती शिंदे उपस्थित होत्या. तसेच ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन चे जिल्हाध्यक्ष शौकत पठाण, भारतीय जनता पक्ष चे नगरसेवक विनोद भोसले, AIMIM गटनेते वहिदा भंडाले, नगरसेवक बाबा अड्डेवाले, अजहर हुंडेकरी, तौफिक हत्तुरे, स्वीकृत नगरसेवक नय्युम सालार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस चे शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी महापौर आरिफ शेख, युथ प्राईड ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष समीर शेख, माजी नगरसेविका फिरदोस पटेल, अॅड. रियाज शेख आदी मान्यवरांची उपस्थिती कार्यक्रमाची शोभा वाढवणारी ठरली.
कार्यक्रमाची सुरुवात कुरआन पठणाने झाली. त्यानंतर सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे रोजा सोडत इफ्तारचा लाभ घेतला. या प्रसंगी सर्व निवडून आलेल्या नगरसेवकांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला…..
आपल्या मनोगतात रियाज हुंडेकरी म्हणाले की, रमजान हा संयम, दया आणि सेवाभाव शिकवणारा महिना आहे. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन प्रेम व शांततेचा संदेश द्यावा, या उद्देशाने दरवर्षी इफ्तार कार्यक्रम आयोजित केला जातो. “राजकारण वेगळे असले तरी समाजहितासाठी सर्वांनी एकत्र यावे, हीच खरी लोकशाहीची ताकद आहे,” असे ते म्हणाले. उपस्थित मान्यवरांनीही या उपक्रमाचे कौतुक करत अशा कार्यक्रमांमुळे समाजातील दुरावा कमी होतो आणि आपुलकी वाढते, असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे नियोजन, व्यवस्था आणि पाहुणचार यासाठी मित्रपरिवारातील सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले होते. शिस्तबद्ध आयोजन, सर्वांसाठी खुली व्यवस्था आणि स्नेहपूर्ण वातावरणामुळे नागरिकांनी कार्यक्रमाचे मनापासून कौतुक केले.
या उपक्रमातून रियाज हुंडेकरी यांनी सामाजिक बांधिलकी जपत सर्वधर्मीय एकतेचा आदर्श निर्माण केल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली. शहरात सकारात्मक सामाजिक वातावरण निर्माण करण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचेही मत नागरिकांनी नोंदवले.



