सोलापूरातील हिंदुत्ववादी चळवळीतील कार्यकर्त्याला भाजपने केले नगरसेवक….
धडपडी अन् एकनिष्ठ कार्यकर्त्याला भाजपने दिली स्वीकृत नगरसेवकाची संधी ; कोण आहेत अक्षय अंजिखाने?

हिंदुत्ववादी चळवळीत प्रामाणिकपणे कार्य करणारे, हिंदुत्वाच्या विचारधारेशी एकनिष्ठ राहून जोमाने पक्षाचे काम करणाऱ्या अक्षय अंजिखाने यांना भारतीय जनता पार्टीने स्वीकृत नगरसेवकपदाचे बक्षीस दिले आहे.
२०१२ साली भारतीय जनता पक्षात सक्रिय झालेल्या अक्षय अंजिखाने यांनी अल्पावधीतच झोकून देऊन पक्षाचे काम सुरू केले. पक्षाकडून आलेल्या आदेशाचे पालन करत सर्व उपक्रम, कार्यक्रम, आंदोलने यांच्यात नियोजन आणि अंमलबजावणी अशा दोन्ही पातळ्यांवर सहभागी होत अक्षय अंजीखाने यांनी पक्षकामाचा धडाका लावला होता. भारतीय जनता पक्षाकडे कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. मात्र यंदा पक्षाने सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीपासूनच विविध ठिकाणी संधी देताना पक्ष कार्याला दिलेला वेळ आणि पक्ष विस्तारासाठी पक्षाच्या विजयासाठी झालेला फायदा हा निकष बहुतांश ठिकाणी लावल्याचे दिसून येत आहे. या निकषात पक्के बसणाऱ्या अक्षय अंजिखाने यांना स्वीकृत नगरसेवक म्हणून संधी देऊन पक्षाने वेळ देणाऱ्या कार्यकर्त्यांना योग्य वेळी संधी मिळत असल्याचा संदेश दिला आहे.
अक्षय अंजिखाने हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रथम वर्गशिक्षित स्वयंसेवक आहेत. हिंदुत्वाच्या चळवळीत विविध पातळ्यांवर त्यांनी आक्रमकपणे काम केले आहे. लव जिहाद, गोरक्षण यांसह अनेक विषयात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. भारतीय जनता युवा मोर्चामध्ये आठ वर्षांपेक्षा अधिक काळ कार्यरत राहून अक्षय अंजिखाने यांनी अनेक आंदोलनांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे. विविध वृत्तवाहिन्यांवर होणाऱ्या चर्चेमध्ये देखील त्यांनी पक्षाची बाजू जोरकसपणे मांडली आहे. लोकसभा निवडणुकीचे भाजपाचे उमेदवार राम सातपुते यांच्या प्रचारासाठी अक्षय अंजिखाने यांनी निवडणूक यंत्रणेत सहभागी होत तळमळीने प्रचाराचे काम केले होते.
महाराष्ट्र राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे भारतीय जनता पक्षाचे तत्कालीन प्रदेशाध्यक्ष असताना अक्षय अंजिखाने यांचा त्यांच्याशी अधिक संपर्क आला. सोलापुरातील इतर पक्षातील अनेक राजकीय नेत्यांना, कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाशी जोडण्यासाठी अक्षय अंजिखाने यांनी चांगली भूमिका निभावली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे, आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, भाजपच्या शहराध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्याशी चांगले संबंध असणारे अक्षय अंजिखाने हे आमदार देवेंद्र कोठे यांचे विश्वासू मानले जातात.
विधानसभा निवडणुकीतही अक्षय अंजिखाने यांनी भाजपा उमेदवारांच्या विजयासाठी अहोरात्र काम करून पक्षाच्या विजयात आपल्या जबाबदारीचा वाटा उचलला. भाजप शहराच्या मंडल अध्यक्षपदाच्या निवडीवेळी आमदार देवेंद्र कोठे यांनी अक्षय अंजिखाने यांना प्राधान्य देऊन नव्या पिढीतील सक्रिय कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतली. शहर भाजपाचा पुढील एक-दोन दशकांचा विचार करून आमदार देवेंद्र कोठे यांच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाने अक्षय अंजिखाने यांच्यासह अनेकांना संधी दिल्याचे दिसून येत आहे.
भारतीय जनता पार्टीचे सर्वात तरुण मंडल अध्यक्ष म्हणून काम करताना अक्षय अंजिखाने यांनी भाजपा प्रदेशाकडून आलेले प्रत्येक कार्यक्रम आपल्या मंडळात यशस्वीपणे करून दाखवले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस समाजोपयोगी कामाने करत मोठ्या प्रमाणावर रक्तदान शिबिरांचे आयोजन करावे या भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत अक्षय अंजिखाने यांनी मध्य पूर्व मंडलात ५६३ रक्त पिशव्यांचे विक्रमी संकलन करून जिल्ह्यात प्रथम क्रमांक तर पश्चिम महाराष्ट्रात तृतीय क्रमांक पटकाविला आहे.
याशिवाय कोरोना काळात गरजूंना रुग्णालयातील खाट, ऑक्सिजन आणि इतर सुविधा पुरविण्यासाठी वॉर रूम उभी करून केलेली मदत केलेली उल्लेखनीय कामगिरी, रामनवमीनिमित्त गरजू नागरिकांना सुरक्षा किट वाटप, सीएए कायद्याच्या समर्थनार्थ सोलापुरात निघालेल्या पदयात्रेच्या नियोजनात सहभाग, अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मध्य पूर्व मंडळात तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राबविण्यात आलेला कार्यक्रम, २०१८ साली भारतीय जनता युवा मोर्चा मंडल सरचिटणीस, युवा मोर्चा मध्य पूर्व मंडल अध्यक्ष, युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष, २०२२ ते २०२४ युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव, २०१९ मध्ये सोलापूर लोकसभा क्लस्टरमध्ये सोलापूर लोकसभा सोशल मीडिया संयोजक जबाबदारी, तसेच पंढरपूर पोटनिवडणूक, गोवा विधानसभा निवडणूक अशा निवडणुकांमध्ये प्रवासी कार्यकर्ता म्हणून काम केले आहे.
पक्षाचे एकनिष्ठपणे काम करणाऱ्या अक्षय अंजिखाने यांना स्वीकृत नगरसेवक पदावर संधी देत भारतीय जनता पक्षाने नव्या नेतृत्वाच्या खांद्यावर पक्षाची धुरा सोपवण्याचा पाडलेला पायंडा कायम ठेवला आहे.



