सोलापूर पोलीस पेट्रोल पंपावरील रकमेची पोलीसास मारहाण करुन लुटमार केल्याचे आरोपातून ९ तरुण निर्दोष मुक्त…
सोलापूर येथील पोलीस हेडक्वॉर्टर जवळील पोलीस पेट्रोल पंपावरील रक्कम हेडक्वॉर्टर येथे जमा करणेसाठी जात असतांना सहा. पोलीस फौजदार मारुती राजमाने यांना अडवून मारहाण करत त्यांचेकडील रक्कम रु.५,००,०००/- लुटून नेली अशा आरोपावरुन १) अमित जाधव २) कुमार भोसले ३) विठ्ठल भोसले ४) कुमार सुरवसे ५) फिरोज शेख ६) आदिप दोरकर ७) गुलाब मुलाणी ८) अभिजित खबाले ९) रामेश्वर धनावडे यांचेवर भरलेल्या खटल्याची सुनावणी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधिश श्री. सलमान आझमी साहेब यांचे समोर होऊन त्यांनी गुन्हा शाबीत न झाल्यामुळे सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली.
यात हकीकत अशी की, पोलीस पेट्रोल पंपावरील विक्रीतून आलेली रक्कम रोजच्या रोज कर्तव्यावरील पोलीसांकडून बँकेत भरणा जायचे मात्र बँकेला सुट्टी असल्यास ती रक्कम पोलीस हेडक्वॉर्टरमधील लॉकरमध्ये जमा करावी लागायची. दि.१८/०३/२०१८ रोजी बँकेस रविवार सुट्टी असल्याने सहा. पोलीस फौजदार मारुती राजमाने हे गोळा झालेली रक्कम हेडक्वॉर्टर लॉकरमध्ये जमा करण्यास रात्री ११.०० वा. सुमारास निघाले असतांना अज्ञात लोकांनी त्यांना आडवून रक्कम रु.५,००,०००/- ची लुट केली अशा आशयाची फिर्याद मारुती राजमाने यांनी जेलरोड पोलीस ठाण्यात दिली. त्यावरुन तत्कालीन पोलीस निरीक्षक ए.पी. कुंभार व बी. एस. शिंदे यांनी तपास करत आरोपींना अटक करुन त्यांचेकडून रक्कम जप्त करुन दोषारोपपत्र पाठविले होते.
खटल्यामध्ये सरकारतर्फे एकूण ९ साक्षीदार तपासण्यात आले.
खटल्याची सुनावणीचेवेळी आरोपीचे वकील ऍड. मिलिंद थोबडे यांनी आपले युक्तीवादात पोलीसांचे रकमेची लुटमार झाल्याचे सरकार पक्षाने शाबीत केले नाही. मात्र यातील फिर्यादीने लुटमार झाल्याचे खोटा कांगावा केला व त्याचे घरातून बरीच मोठी रक्कम जप्त झाली. त्यामुळे फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीतील कथनावर संशय निर्माण होतो असा युक्तीवाद केला, ते ग्राहय धरुन आरोपीची निर्दोष मुक्तता केली.
यात आरोपी नं.१ सह ४ आरोपीतर्फे ऍड. मिलिंद थोबडे, ऍड. सतिश शेटे, ऍड. प्रथम गायकवाड यांनी तर उर्वरित ५ आरोपीतर्फे ऍड. जयदिप माने यांनी तर सरकारपक्षातर्फे ऍड. ए. जी. कुर्डुकर व ऍड. नरखेडकर यांनी काम पाहिले