1 लाख 95 हजारची लाच मागितल्या प्रकरणातून अकलूज नगरपंचायतीच्या स्वच्छता निरीक्षकाची जामीनावर मुक्तता…
यातील तक्रारदार यांच्या श्री. गणेश इंडस्ट्रियल सर्व्हिसेस, बारामती या कंपनीला अकलूज नगरपरिषदेने शहरातील रस्ते, बाजारपेठा, वाणिज्य गाळे, शौचालय साफसफाई करणेकामी मनुष्यबळ पुरवठा करण्याची निविदा मंजूर झालेली होती.
यातील आरोपी स्वच्छता निरीक्षक, नितीन पेटकर यांनी तक्रारदाराच्या कामगारांचे पगाराचे बिल मंजूर करून देण्यासाठी म्हणून बिलाच्या 3% रक्कम व यापूर्वी वर्क ऑर्डर दिलेल्या कामाचा मोबदला म्हणून रक्कम रु. 1,50,000/- अशी एकूण रक्कम रु. 1,95,000/- च्या लाचेची मागणी केलेली होती.
स्वच्छता निरीक्षक नितीन पेटकर हे तक्रारदार यांच्याकडे लाच मागत असल्याची तक्रारदाराची खात्री झाल्याने त्यांनी सोलापूर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे आरोपी नितीन पेटकर यांच्याविरुद्ध रितसर तक्रार नोंदवलेली. त्यानुसार लाचेबाबतची सरकारी पंचांसमक्ष पडताळणी करण्यात आली असता, आरोपी नितीन पेटकर यांनी तक्रारदार यांच्याकडे रक्कम रु. 1,95,000/- ची लाचेची मागणी केल्याचे पडताळणी सापळा कारवाई दरम्यान निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध पुढील लाचेसंदर्भातील सापळा रचण्यात आला. परंतु आरोपी नितीन पेटकर यांना संशय आल्याने त्यानी तक्रारदाराकडून लाच रक्कम स्वीकारली नाही. परंतु आरोपी नितीन पेटकर यांनी तक्रारदाराकडून लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमानुसार अकलूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येऊन त्यांना माळशिरस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायालयासमोर हजर करण्यात आले.
त्यावेळी आरोपी नितीन पेटकर यांच्यावतीने ॲड. निलेश जोशी यांनी जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. सदर जामिनाच्यावेळी ॲड. निलेश जोशी यांच्यावतीने करण्यात आलेला युक्तिवाद ग्राह्य धरून माळशिरस येथील मे. जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री. आर. व्ही. ताम्हणेकर सो। यांनी आरोपी नितीन पेटकर यांची रक्कम रु. 30,000/- च्या जामीनावर मुक्तता केली.
यात आरोपीच्यावतीने ॲड. निलेश जोशी, ॲड. यशश्री जोशी, ॲड. कचरे, ॲड. राणी गाजूल, ॲड. ओंकार परदेशी यांनी काम पाहिले.