36 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी करा – शिक्षण आयुक्त मांढरेंचे थेट ‘एसीबी’ला पत्र
राज्याच्या शिक्षण क्षेत्रातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्यातील 36 शिक्षण अधिकाऱ्यांची चौकशी केली जावी, अशा मागणीचे पत्र चक्क शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी एसीबीला दिले आहे. शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने आयुक्तांनी एसीबीला पत्र लिहल्याचे बोलले जात आहे.
दुसरीकडे नुकतेच वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या विभागामध्ये पैशाच्या मोबदल्यात बदल्या झाल्याची बातमी समोर आली तर आता शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार उघड होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
छापे, पण चौकशी नाही
शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू आहे. अधिकारी लाच घेताना पकडले जातात मात्र पुन्हा सेवेत येतात, पुन्हा भ्रष्टाचार करतात पण कारवाई होत नाही. त्यामुळे आयुक्त सुरज मांढरे यांनी एसीबीला पत्र लिहिल्याची माहिती समोर येत आहे. ज्या शिक्षकांवर छापे पडले त्यांची खुली चौकशी करण्याची मागणी एसीबीला लिहिलेल्या पत्रात सूरज मांढरे यांनी केली.
लाचेच्या घटना वाढल्या
राज्यातील शिक्षण विभागाच्या कार्यालयात गेल्या काही वर्षांपासून भ्रष्ट कारभाराची कीड लागली आहे. शिक्षक बदल्यांसाठी अनेक अधिकारी आणि कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात अडकल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. शिक्षक बदलीच्या फायलीवर आर्थिक वजन ठेवल्यानंतर शिक्षकांना सोयीच्या जिल्ह्यात बदली झाल्याची अनेक प्रकरणे गेल्या काही वर्षात समोर आली. एवढच काय तर शिक्षक बदलीसाठी दरपत्रक देखील ठरल्याच्या चर्चा आहेत.
दरपत्रकाची चर्चा
दरम्यान, काही सुत्रांच्या माहितीनुसार शिक्षण क्षेत्रात अशाप्रकारे भ्रष्ट्राचार होतो. धक्कादायक बाब म्हणजे त्यासाठी दरपत्रक देखील ठरलेला आहे. कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी – एक ते दीड लाख रुपये, शालार्थ प्रकरणांसाठी ऐंशी हजार ते एक लाख रुपये, मेडिकल बिल मंजुरीसाठी-बिलाच्या रकमेच्या 5 ते 20 टक्क्यांपर्यंत शिक्षक बदलीसाठी 50 हजार ते दोन लाख रुपयापर्यंत. असे दरपत्रक देखील चर्चिले जात आहे. त्यामुळे दिवसेंदिवस वाढता आलेख कमी करण्यासाठी चौकशीची मागणी होत आहे.