महाराष्ट्रक्राईम

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर 30 जणांचा तलवारीने हल्ला…

महाराष्ट्रात गुंडाराज आहे की काय? अशी स्थिती निर्माण झाल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे होम टाऊन असलेल्या ठाणे शहरात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली आहे. चिंताजनक म्हणजे ही महिला पदाधिकारी 6 महिन्यांची गर्भवती आहे.

तर, मुंबईतील ताडदेव परिसरात राष्ट्रवादी काँग्रेसच्या 3 कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात 2 जण गंभीर झाले आहेत. सोमवारी रात्री या दोन्ही घटना घडल्या आहेत.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दोन्ही घटनांची दखल घेत आज ठाण्यात तातडीने पोलिसांची बैठक बोलावली आहे. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानेच विरोधकांवर हे हल्ले करण्यात आले आहेत, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत केला आहे.

राष्ट्रवादीचे 2 कार्यकर्ते गंभीर जखमी

मुंबईच्या ताडदेव भागात सोमवारी रात्री राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या 3 कार्यकर्त्यांवर 30 ते 40 जणांनी तलवारीने हल्ला केला. यामध्ये तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ताडदेव पोलिसांनी याप्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. अन्य आरोपींचा शोध सुरू आहे. मात्र, हल्ला कुणी केला? हल्ल्यामागील नेमके कारण काय?, हे अद्याप समजू शकले नाही.

इमारतीत शिरताना हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. त्यांच्या हातात तलवार, चॉपर दिसत आहे.

ताडदेवच्या जनता नगरमध्ये ही घटना घडली. एका इमारतीत हल्लेखोर तलवारी व चॉपर्स गेऊन शिरले व तिथे राहणाऱ्या राष्ट्रवादी युवा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हल्ला केला. या हल्ल्यात राष्ट्रवादीचे दोन कार्यकर्ते गंभीर जखमी झाले. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत 3 हल्लेखोरांना अटक केली. उर्वरित हल्लेखोरांना पळून जाण्यात यश आले. त्यांचा शोध पोलिसांकडून सुरू आहे. हल्लेखोर नेमके कोण होते? कुठून आले होते? त्यांचा हेतू काय होता?, याबाबत तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

महिला पदाधिकाऱ्यावर अमानुष हल्ला

ठाण्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटात मारामारी झाल्याची घटना समोर आली आहे. घोडबंदर (ठाणे) येथील कासारवडवली भागातील शोरूममध्ये घुसून ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर शिंदे गटातील महिला कार्यकर्त्यांनी अमानुष हल्ला केला. गंभीर जखमी रोशनी शिंदे ही गर्भवती असून, स्थानिक पोलिसांनी अद्याप या घटनेचा एफआयआर दाखल केलेला नाही, असा आरोप खासदार राजन विचारे यांनी केला आहे.

ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला घेरुन शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे.

महिला आयसीयूमध्ये

शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी यांना उपचारासाठी आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे. त्यांनी फेसबुकवर एक पोस्ट टाकल्याचे सांगितले जात आहे. त्याला आक्षेपार्ह म्हणत शिंदे गटाने त्यांना बेदम मारहाण केल्याचा आरोप आहे.

पोलिसांवर दबाव, आव्हाडांचा आरोप

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी या घटनेचा निषेध केला आहे. ठाकरे गटाच्या रोशणी शिंदे यांना ठाण्यात शिंदे गटाकडून मारहाण झाली. मला खात्री आहे काही होणार नाही. न्यायची अपेक्षा सोडली. सरकार कसे चालवायचे हे मुख्यमंत्री शिंदे यांच्या कडून शिकावे. पोलिस खात्याचे अस्तित्वच नाही ठाण्यात. विचारले तर पोलिस सांगतात वरुन प्रेशर आहे, अशा शब्दांत त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर सडकून टीका केली आहे.

शिंदेंच्या सांगण्यावरुनच हल्ला- संजय राऊत

मुख्यमंत्री शिंदे यांच्या सांगण्यावरून ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यावर हल्ला झाल्याचा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. ठाण्यातील पोलिसांनी हातात बांगड्या घातल्या आहेत का? तिथे कायद्याचे राज्य आहे की नाही? हल्लेखोरांवर कारवाई का होत नाही?, असा सवाल राज्य सरकारला विचारत राऊत म्हणाले की, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनाही हल्ला कसा करायचा हे माहीत आहे. ठाण्यातील या घटनेवरून त्यांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

Related Articles

Back to top button
bimbo togel bimbo togel