रोहित पवार यांच्या कंपनीवर धाड पडताच सोमय्या यांचं ट्विट का होतंय व्हायरल; काय म्हटलंय ‘त्या’ ट्विटमध्ये?

किरीट सोमय्यांच्या नव्या ट्विटमध्ये गंभीर आरोप
किरीट सोमय्या यांनी आपल्या या ट्विटचा फोटो पुन्हा ट्विट करत रोहित पवारांवर गंभीर आरोप केले आहेत. “मी पुन्हा एकदा तपास यंत्रणांना रोहित पवार यांच्याविरोधात सखोल तपास करण्याची विनंती करतो. कोट्यवधी रुपयांचा कन्नड सहकारी साखर कारखाना बारामती अॅग्रोने अवघ्या 50 कोटी रुपयांत विकत घेतला होता”, असं किरीट सोमय्या यांनी आपल्या नव्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी कारवाई
रोहित पवार हे शरद पवार यांच्या गटाचे आक्रमक नेते आहेत. ते बारामती अॅग्रोचे संचालक आहेत. महाराष्ट्र शिखर बँक घोटाळा प्रकरणी ईडीने बारामती अॅग्रोवर आज छापा टाकलाय. पुण्यातील हडपसर येथील बारामती अॅग्रोच्या कार्यालयातदेखील ईडीने छापा टाकला आहे. ईडीचे सहा अधिकारी या कार्यालयात आज सकाळी दाखल झाले. अधिकाऱ्यांकडून सकाळपासून कागदपत्रांची झडती घेतली जात असल्याची माहिती मिळत आहे. बारामतीमधील पिंपळे येथे बारामती अॅग्रोचं कार्यालय आहे. तिथे देखील ईडीची धाड पडलीय. तसेच रोहित पवार यांचा छत्रपती संभाजीनगर येथे एक कारखाना आहे. तिथे देखील ईडीने धाड टाकली आहे.



