हे खरंय! चिकन तंदुरी सुद्धा या डाळीपुढे काहीच नाही, मटण तर नुसतं नावाला!

मुंबई : शरीराला प्रोटीन्स मिळण्यासाठी आपण विविध प्रकारच्या भाज्यांबरोबरच दूध आणि अंड्यांचा आहारात समावेश करतो. काही जण अंडी खात नाहीत, ते दुधाला प्राधान्य देतात, तर अंडी खाणारे या दोन्ही पदार्थांचं सेवन करतात.
अंडी व दूध यात प्रोटीन्सचं प्रमाण चांगलं असतं; पण याशिवाय अशी एक डाळ आहे, जिच्यामध्ये या दोन्हींच्या तुलनेत कैक पटींनी अधिक प्रोटीन्स असतात. तुम्ही ही डाळ खात नसाल, तर यापुढे मात्र तुमच्या आहारात तिचा समावेश करायला विसरू नका. ही डाळ म्हणजे चवळीची डाळ होय. चवळीच्या एक वाटी डाळीमध्ये दोन अंड्यांइतके प्रोटीन्स असतात. ही डाळ तुम्हाला हेल्दी राहण्यास खूप मदत करेल. यात फक्त प्रोटीन्सच नाही तर कॅल्शियमही मुबलक प्रमाणात आढळतं.
‘हेल्थलाइन’च्या रिपोर्टनुसार, चवळीची डाळ शाकाहारी व्यक्तींसाठी प्रोटीन्सचा सर्वोत्तम स्रोत मानली जाते. चवळीच्या डाळीमध्ये प्रोटीन, कॅल्शियम, फायबर आणि मिनरल्स मोठ्या प्रमाणात आढळतात. एक कप म्हणजेच 170 ग्रॅम चवळीच्या डाळीमध्ये 13 ग्रॅम प्रोटीन्स असतात. हे प्रमाण अंड्यांपेक्षा जवळजवळ दुप्पट आहे. या डाळीमध्ये दुधापेक्षा चार पट जास्त प्रोटीन्स असतात. 100 ग्रॅम दुधात 3.4 ग्रॅम प्रोटीन असतात, तर चवळीमध्ये यापेक्षा किती तरी पट अधिक असतात. ही डाळ आरोग्यासाठी चिकनपेक्षा जास्त उपयुक्त आहे, असं मानलं जातं. चवळीची डाळ इतकी उपयुक्त आहे, याबाबत माहिती नसल्याने अनेक जण ती खात नाहीत; पण जे आपल्या आरोग्याची विशेष काळजी घेतात, ज्यांना सकस व हेल्दी आहार घ्यायला आवडतो, त्यांच्या रुटीनमध्ये चवळीची डाळ असणं खूप फायद्याचं ठरू शकतं.
चवळीच्या डाळीमुळे स्नायू मजबूत होतात. चवळीची डाळ खाल्ल्याने एनर्जी दिवसभर टिकून राहते. या डाळीमुळे पोटाशी संबंधित समस्याही दूर होतात. या डाळीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स असतात. ते पचनाशी संबंधित समस्या दूर करण्यास मदत करतात. चवळीच्या डाळीमध्ये मुबलक प्रमाणात मँगनीज असतं. त्यामुळे शरीराला इन्स्टंट एनर्जी मिळते आणि कमजोरी दूर होण्यास मदत होते. चवळीची डाळ अनेक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट्सचा खजिना असते. हे अँटिऑक्सिडंट्स शरीरातल्या ऊर्जा निर्माण करणाऱ्या पेशींना ताकद देतात. चवळीची डाळ ही डायबेटीसच्या रुग्णांसाठीही उत्तम मानली जाते. चवळीची डाळ खाल्ल्याने रक्तातली साखर नियंत्रित राहते, असं अनेक संशोधनातून समोर आलं आहे.