सोलापूरात पोलीसांना खोटी माहिती दिली , गुन्हा दाखल
डायल 112 वर केलं खोटा कॉल, सदर प्रकरण आला अंगलट
सोलापूर : महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना एकाच वेळी पोलीसांकडुन सर्व प्रकारची मदत मिळावी या उद्देशाने डायल 112 ही योजना सुरू करण्यात आली आहे. दि. 27.04.2024 रोजी सोलापूर तालुका, पोलीस ठाणे कडील नेमणुकीस असलेले पोहवा/1545 गणेश लोखंडे यांना डायल 112 चे कर्तव्य देण्यात आले होते. त्यावेळी त्यांना त्याचे एम.डी.टी चॅनल नंबर 1 वर 12.02 वा.सुमारास मोबाईल नंबर 7218261026 वरून अज्ञात व्यक्तीने बोरामणी ता.द.सोलापूर येथील व्हॉलीबॉल मैदानाच्या ठिकाणी एका 18 वर्षीय मुलीला तिच्या नव-याने अर्ध्या तासापुर्वी मारहाण करून कु-हाडीने जीवे मारले आहे अशी माहिती दिली होती.
त्याप्रमाणे पोहवा/लोखंडे यांनी प्राप्त माहिती नुसार मोबाईल नंबर 7218261026 वर संपर्क साधला परंतु सदर मोबाईल धारकाने तो स्वीकारला नाही म्हणुन त्यांनी दिलेल्या माहितीची खातरजमा करणे करीता बोरामणी येथे बोरामणी गावचे पोलीस पाटील व पोलीस ठाणे कडील ताबे पोलीस अंमलदार याचेसह जाऊन माहिती घेतली असता तेथे असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे समजुन आले.
यावरून डायल 112 वर मोबाईल नंबर 7218261026 यांनी पोलीसांना खोटी माहिती पुरविली म्हणुन त्याचे विरूध्द गणेश मारूती लोखंडे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादी वरून भारतीय दंड संहिता कलम 182 प्रमाणे सोलापूर तालुका, पोलीस ठाणेस गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याव्दारे नागरिकांना आवाहन करण्यात येते की, डायल 112 हे नागरिकांच्या मदती करीता असून त्यावर कोणत्याही नागरिकांनी चुकीची अथवा खोटी माहिती पोलीसांना पुरविल्याचे निष्पन्न झालेस त्या संबंधीत नागरिका विरूध्द योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे मा.श्री.संकेत देवळेकर, उपविभागीय पोलीस अधिकारी, सोलापूर ग्रामीण उपविभाग सोलापूर यांनी सांगितले आहे.