सोलापुरातील जहांगीर सिंदगीकर सह 3 जणांना 5 वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा अन् 1 लाख 20 हजारांचा दंड

सोलापूर- यात थोडक्यात हकिकत अशी की, फिर्यादी बंदगी सिंदगीकर हे दिनांक १३/०९/२०२१ रोजी दुपारी ०४.०० वाजता आरोपीच्या घरी घर नं. १३, सिध्देश्वर पेठ, सोलापूर येथे गेले असता त्यांच्या सोबत त्यांचे इतर नातेवाईक त्यांच्या घराच्या वाटणीच्या चर्चेच्या कारणास्तव गेले असता यातील वरील सर्व आरोपी हे त्याठिकाणी हजर होते. सदर घराच्या वाटणीच्या चर्चेच्या दरम्यान आरोपी व फिर्यादी मध्ये घराच्या वाटणीवरुन वाद झाला. त्यामुळे त्यातील फिर्यादी व त्यांचे नातेवाईक हे आरोपीच्या घरातून बाहेर निघुन गेले. फिर्यादीचे काका लतिफ सिंदगीकर यांचा मुलगा मयत झाल्याने त्याचा दहाव्याचा कार्यक्रम असल्याने फिर्यादी व त्याचे नातलग हे त्यांच्या घरी सांत्वन करण्यासाठी चालले असता घराच्या वाटणीच्या कारणावरुन यातील आरोपी क्र. ०१ जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हणाला की, “इसकोच खतम करो, येच मेन काटा है.” असे म्हणल्यावर आरोपी क्र. ०२ अबूतलाह सिंदगीकर हा फिर्यादी जवळ आला त्याने फिर्यादीच्य दोन्ही हाताला घट्ट पकडले त्यावेळी आरोपी क्र. ०३ जैद सिंदगीकर याने त्याच्या हातातील तलवारीने फिर्यादीवर वार केला. ती तलवार फिर्यादीच्या डोक्यावर उजव्या कानाच्या पाटीमागे बसली. त्यावेळी आरोपी क्र. ०१ जहांगीर सिंदगीकर याच्या हातामध्ये खिळे काढण्याची कटावणी होती. त्याच कटावणीने आरोपी जहांगीर सिंदगीर याने फिर्यादीच्या डोक्यात मारले. तेवढयात तेथे आरोपी क्र. ०४ अबूबखर सिंदगीकर हा आला व त्याने त्याच्या हातातील रॉडने फिर्यादीच्या डोक्यावर मारले. त्यावेळी फिर्यादीचा भाचा महिबूब बागवान हा अडवण्याकरीता मध्ये आला असता
त्याच्या डोक्यात आरोपी क्र. ०३ जैद याने तलवार मारली. त्यामुळे त्याच्यापण डोक्यातून रक्तस्राव होवू लागला. हे सर्व पाहून फिर्यादी यांच्या सोबात आलेले इतर दोन नातेवाईक हे सोडवण्याकरीता मध्ये आले असता आरोप जहांगीर, आरोपी अबूतलाह व आरोपी अबूबखर यांनी त्यांना लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. यातील चार ही आरोपी हे फिर्यादी यांच्या घर जागेच्या वाटणीच्या कारणावरुन जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने तलवारीने, कटावणीने व लोखंडी रॉडने फियादी व त्यांच्या इतर नातेवाईकांना वरील सर्व आरोपीनी मारहाण केली. फिर्यादीने फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे तक्रार दिली असता पोलिसांनी म्हणून यातील आरोपी क्र. १. जहांगीर लालसाब सिंदगीकर, आरोपी क्र. २. अबूतलाह जहांगीर सिंदगीकर, आरोपी क्र. ३. जैद जहांगीर सिंदगीकर व आरोपी क्र. ४. अबूबखर जहांगीर सिंदगीकर यांच्य विरुध्द भा.दं.वि. कलम ३०७, ३२३,५०६,३४ तसेच सह शस्त्र अधिनियम कलम ४ व २५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७-१-ए व १३५ या प्रमाणे फौजदार चावडी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला.
सदर प्रकरणामध्ये सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी मा न्यायालयामध्ये एकुण आठ साक्षीदार तपासले. त्यात दोन जखमी नेत्र साक्षीदार व एक नेत्र साक्षीदार तसेच पंच, वैदयकीय अधिकारी व तपासिक अंमलदार यांची साक्ष महत्वाची ठरली.
तसेच जिल्हा सरकारी वकील प्रदिपसिंग राजपूत यांनी असा युक्तीवाद केला की, दोन्ही जखमींच्या कपडयांवर आरोपींचा रक्तगट मिळून आला. सदरचा हल्ला हा आरोपींनी जाणून-बूजून फिर्यादीला व त्यांच्या नातेवाईकांना जीवे ठार मारण्याच्या उद्देशानेच केला होता. तसेच घराच्या वाटणीच्या कारणावरुन यातील आरोपी क्र. ०१ जहांगीर सिंदगीकर याने फिर्यादीला उद्देशून म्हणाला की, “इसकोच खतम करो, येच मेन काटा है.” असे म्हणून आरोपीने इतर सह आरोपींना गून्हा करण्यास प्रवृत्त केले व फिर्यादीवर प्राणघातक हल्ला केला.
सदरचा युक्तीवाद मा. न्यायाधीश श्रीमती आर. एन. पांढरे मॅडम, जिल्हा न्यायाधीश क्र. ०१, सोलापूर यांनी ग्राह्य धरला व सर्व आरोपींना भा.दं. वि. कलम ३०७ अन्वये पाच वर्षे सक्त मजूरीची शिक्षा व रक्कम रु. १०००/- दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास तीस दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भा.दं. वि. कलम ३२३ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व रक्कम रु. ५००/- दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली. तसेच भा.दं. वि. कलम ५०६ अन्वये सहा महिन्यांची शिक्षा व रक्कम रु. ५००/- दंडाची शिक्षा सुनावली. दंड न भरल्यास १५ दिवसांचा साध्या कारावासाची शिक्षा सुनावली व यातील फिर्यादीला व जखमी यांना सर्व चारही आरोपींनी प्रत्येकी रक्कम रु. १५०००/- इतकी असे मिळून एकूण रक्कम रु. १,२०,०००/- इतकी नुकसान भरपाई देण्याचा आदेश पारीत केला.
सदर प्रकरणात सरकारपक्षातर्फे जिल्हा सरकारी वकिल अॅड. प्रदिपसिंग राजपूत यांनी काम पाहिले. तर आरोपींच्या वतीने अॅड. मिलिंद थोबडे यांनी काम पाहिले. तसेच सदर प्रकरणाचा तपास तपासिक अधिकारी पी.एस.आय. अश्विनी काळे यांनी केला. तसेच कोर्ट पैरवी म्हणून विक्रांत कोकणे यांनी काम पाहिले.