सोलापूर – 1.40 लाखाचा गुटखा शेतात लपवून ठेवल्याप्रकरणी मुख्य आरोपीचा जामीन मंजूर…

शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा तब्बल 1 लाख 40 हजार रुपयाचा साठा बेकायदेशीररित्या शेतामध्ये लपवून बाळगल्या प्रकरणी दाखल गुन्ह्यामधील मुख्य आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी वय – 38 वर्ष, राहणार मुक्काम पोस्ट- सौंदाणे, तालुका- मोहोळ, जिल्हा- सोलापूर यास सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे. जे. मोहिते साहेब यांनी जामीन मंजूर केलेला आहे.
घटनेची थोडक्यात हकीकत अशी की,
दिनांक 12 डिसेंबर 2024 रोजी मौजे सौंदणे, तालुका- मोहोळ, जिल्हा- सोलापूर येथील श्री समाधान भीमराव दहिवडे यांच्या शेतामध्ये दिगंबर बाळासाहेब कोळी यांनी महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला सुगंधित तंबाखूचा साठा बाळगल्याची माहिती मिळाल्यानंतर मोहोळ पोलिसांनी सदर ठिकाणी छापा मारून आरोपीस मालासह पोलीस स्टेशनला आणून अन्न सुरक्षा अधिकारी श्री अशोक यमनप्पा इलागेर यांना कळविल्यानंतर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिनांक 13 डिसेंबर 2024 रोजी मोहोळ पोलीस स्टेशन येथे जाऊन सदर जप्त मुद्देमालाची तपासणी करून त्यामध्ये सुगंधी तंबाखू घटक पदार्थ असल्याचे व सदरचा सुगंधी तंबाखू प्रतिबंधित असल्याने एकूण मुद्देमाल रक्कम रुपये १ लाख 40 हजार चा बेकायदेशीर रित्या साठा केल्याप्रकरणी मोहोळ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती.
सदर अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या फिर्यादी नुसार आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी यांच्या विरुद्ध मोहोळ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर ८९२/२०२४ भारतीय न्याय संहिता कलम 223, 274, 275, 123 प्रमाणे तसेच अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम कलम 59 अन्वये गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्यामध्ये पोलिसांनी आरोपीस अटक करून मोहोळ कोर्टामध्ये हजर केले असता आरोपीस दिनांक 16 डिसेंबर 2024 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली होती व त्यानंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये झाली.
सदर मुख्य आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी यांनी सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये अँड रियाज शेख यांच्या मार्फत जामीन अर्ज सादर केला होता. सदर जामीन अर्जाची सुनावणी सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री जे.जे. मोहिते साहेब यांच्या कोर्टामध्ये झाली एकंदरीत सदर जामीन अर्जाच्या युक्तिवादावेळी अँड रियाज शेख यांनी सदर आरोपीच्या विरुद्ध लावण्यात आलेले कलम 123 हे प्रथमदर्शनी लागूच होत नाही. आरोपीच्या ताब्यातून कोणताही मुद्देमाल मिळालेला नाही, त्याला खोट्या केस मध्ये गुंतविलेले आहे, कायद्याच्या इतर कलमांची तरतूद ही जामीन पात्र कलमाची असून केवळ आरोपींना नुकसान व्हावे म्हणून कलम 123 लावण्यात आले आहे. सदर कलमाचा लागू होतो अथवा नाही याबद्दल साशंकता आहे. त्यामुळे आरोपीस जामीन मंजूर करण्याचा सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सत्र न्यायाधीश श्री जे.जे. मोहिते साहेब यांनी आरोपी दिगंबर बाळासाहेब कोळी यास रक्कम रुपये 50 हजार च्या जामीन कदबवर व पोलीस स्टेशनला हजेरी देण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.
सदर प्रकरणांमध्ये आरोपी तर्फे अँड रियाज एन. शेख तर सरकार पक्षातर्फे बुजरे यांनी काम पाहिले.



