बसवप्रेमींनी मध्यरात्री दीड वाजता केले बसवेश्वर पुतळ्याचे पूजन…
पूजनास सर्वधर्मीय युवा वर्गाचा मोठा प्रतिसाद

सोलापूर : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नूतनीकरणासाठी चबुतऱ्यावरून हलवण्यात आला होता. बसवजयंतीपूर्वी म्हणजेच रविवारी रात्री बारा वाजता बसवेश्वर सर्कल येथे पुतळ्याचे आगमन होताच बसवप्रेमींनी एकच जल्लोष केला. मध्यरात्री दीड वाजता पुतळा चबुतऱ्यावर स्थापित केल्यानंतर उपस्थित बसवप्रेमींनी सामूहिक पूजन केले.
1987 मध्ये जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा पुतळा कोंतम चौक येथे बसविण्यात आला होता. त्यास जवळपास 40 वर्षे झाली होती. काही ठिकाणी पुतळ्यास भेगा पडल्या होत्या. पावसाचे पाणी त्या भेगातून पुतळ्यामध्ये जाऊन पुतळ्यास धोका निर्माण झाला होता. ही गोष्ट बसव ब्रिगेडने मनपा प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. तेव्हा मूर्तिकार महेश शहाणे यांच्याकडे पुतळा दुरुस्तीसाठी देण्यात आला.
पुतळा काढल्यानंतर चबुतऱ्याची परिस्थिती गंभीर बनली होती. ती देखील बसव ब्रिगेडने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर चबुतरा देखील पाडण्यात आला. या सर्व गोष्टीसाठी एक वर्षाचा कालावधी गेला. यंदाची बसव जयंती 19 एप्रिल रोजी आहे. त्यापूर्वी बसवेश्वर महाराजांचा पुतळा स्थापित करा असे प्रशासनाला कडे मागणी केली असता प्रशासनाने त्याकडे डोळेझाक केली. वर्षभर कालावधीनंतरही पुतळा पुन्हा बसवेश्वर सर्कल येथे स्थापित न केल्यामुळे 22 बसवप्रेमी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलनाचा पवित्रा घेतला. एक दिवसीय लाक्षणिक उपोषणानंतर प्रशासनास जाग आली. त्यांनी लागलीच कंत्राटदाराला चबुतरा उभारणीचे काम दिले.
दीड महिन्याच्या कालावधीत चबुतऱ्याची उभारणी करण्यात आली आणि नूतनीकरण झालेला पुतळा चबुतऱ्यावर स्थापित करण्यात आला. त्यावेळी बसवप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ उत्सव समिती अध्यक्ष शरणराज केंगनाळकर व जगतज्योती महात्मा बसवेश्वर महामंडळाचे उत्सव समिती अध्यक्ष प्रसाद झुंजे यांच्या हस्ते व नगरसेवक प्रवीण दर्गोपाटील, सुदीप चाकोते, वीरेंद्र हिंगमिरे, बसव ब्रिगेडचे अध्यक्ष अमित रोडगे, वीरशैव व्हिजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले व राहुल बुऱ्हाणपुरे यांच्या उपस्थितीत महात्मा बसवेश्वर यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. पूजनानंतर फटाक्यांची आतिषबाजी, पेपर शॉट व कोल्ड फायर उडविण्यात आले.
यावेळी गणेश साखरे, डॉ. प्रकाश घटोळे, केदार वनारोटे, सचिन कुलकर्णी, देविदास चेळेकर, किसन गर्जे, गोपाळ झंवर, प्रेम भोगडे, शिवराज झुंजे, वीरशैव व्हिजन उत्सव समितीचे अध्यक्ष विजयकुमार बिराजदार, युवक अध्यक्ष सोमनाथ चौधरी, मन्मथ कपाळे, विजयकुमार हेले, बसवराज चाकाई, शिवशरण साखरे, सुनील धरणे, राहुल जत्ती, श्रीकांत कट्टीमनी, परमेश्वर माळगे, राजकुमार सारणे, दत्ता केरे, अविनाश बिराजदार, भरत कुरणे, मळसिद्ध रोकडे, विकास हिरेमठ, शिवराज विभुते, शुभम हंचनाळे, चेतन म्हमाणे, गणेश हक्के, गुरुराज कोनापुरे आणि समतानायक प्रतिष्ठानचे युवा सदस्य उपस्थित होते.



