आता ‘स्वराज्य’ला बाहेर पडावे लागेल – छत्रपती संभाजीराजे
सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी, त्यांची कामे करण्यासाठी आता ‘स्वराज्य’ला बाहेर पडावे लागेल, असे मत छत्रपती संभाजीराजे यांनी व्यक्त केले. स्वराज्य संघटनेचे कार्यालय ‘स्वराज्य भवन’चा लोकार्पण सोहळा तसेच संघटनेचे पहिले अधिवेशन पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात संपन्न झाले यानिमित्त छत्रपती संभाजी राजे बोलत होते.
स्वराज्य आणि इतर पक्षांमध्ये असलेला फरक लोकांना लक्षात यायला हवा, असे काम करा, असे आवाहन युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केले. स्वराज्य या पुढील काळात सक्षम पर्याय म्हणून येणारच. आपण विस्थापित आहोत मात्र त्यासाठी घाबरण्याची गरज नाही. एखादा नेता सुसंस्कृत असेल तर तो आपल्या सोबत स्वराज्य मध्ये येईलच, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.
शिवाजी महाराजांचे गुण अंगिकार करा
छत्रपती शिवाजी महाराजांनी अशक्य गोष्ट शक्य करून दाखवली होती. त्यांचे दोन टक्के गुण जरी आपण अंगीकारले तरी आपण राज्यात सत्ता स्थापन करू, असा विश्वास युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी अधिवेशनात व्यक्त केला. मी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांचा वंशज म्हणून नाही तर शिलेदार म्हणून बाहेर पडलो असल्याचेही त्यांनी सांगितले.
राजकीय नेत्यांची चूक नाही
छत्रपती शिवाजी महाराजांना देखील स्वराज्य स्थापन करताना अनेक अडचणी आल्या. मात्र शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलेच. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मूळ मंत्र आपल्याला दिला आहे. त्यांच्याप्रमाणे आजही अनेक प्रस्थापित लोक आपल्याला त्रास देतील. ते माजलेले आहेत. मात्र, ही त्यांची चूक नाही. त्यासाठी आपण त्यांना निवडून देतो, अशी टीका देखील संभाजीराजे यांनी राजकीय नेत्यांवर केली.