‘आधी सत्ता पळवली आणि शेवटी मायावी शक्तीने धनुष्यही उचललं’; राजू शेट्टींची फेसबुक पोस्ट चर्चेत
मुंबई – मागील काही महिन्यांपासून प्रचंड उलथापालथी अनुभवणाऱ्या महाराष्ट्रातील राजकारणात शुक्रवारी अत्यंत महत्वपूर्ण आणि निर्णायक घडामोड घडली. शिवसेनेवर हक्क कुणाचा, या कळीच्या मुद्द्यावर केंद्रीय निवडणूक आयोगाने अंतिम निर्णय दिला.
आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील असणारी शिंदे गटावर खरी शिवसेना म्हणून शिक्कामोर्तब केले. तसेच, धनुष्यबाण हे चिन्ह देखील शिंदे गटाला बहाल केले.
दरम्यान, शिवसेनेतील या घडामोडींबाबत आता इतर राजकीय पक्षांकडूनही प्रतिक्रिया देण्यात येत असून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी याबाबत प्रतिक्रिया देताना थेट रामायणातील दाखला दिल्याचं दिसून आलं आहे. या संदर्भातील एक पोस्ट देखील त्यांनी आपल्या फेसबुकवर शेअर केली आहे.
यावेळी राजू शेट्टी म्हणाले, ‘रावण धनुष्य उचलू शकला नाही, त्याचा अपमान झाला… नंतर त्याने सीता पळवली आणि रामायण घडलं. मात्र कलयुगातील रावणानं त्यातून बोध घेतला आणि आधी रामायण घडवलं… मग सत्ता पळवली आणि शेवटी मायावी शक्तीने धनुष्यही उचललं. आता मतदार श्रीरामाच्या रुपात येतील त्यावेळीच हे रामायण पूर्ण होईल.’ या आशयाची पोस्ट राजू शेट्टी यांनी केली आहे.
दरम्यान, निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह एकनाथ शिंदे यांना मिळेल, असा निकाल दिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे, तर एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे. त्यामुळे सध्या शिंदे गटात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.