आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना 6 आठवड्यांचा जामीन मंजूर
दिल्लीचे माजी आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी 6 आठवड्यांचा जामीन मंजूर केला. 11 जुलैपर्यंत त्यांना न्यायालयाकडून अंतरिम दिलासा मिळाला आहे. 10 जून रोजी त्यांना पुन्हा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे. सुनावणीदरम्यान न्यायालयाने सांगितले – जैन यांची प्रकृती पाहता त्यांना सोडण्यात यावे. यादरम्यान ते दिल्लीबाहेर जाणार नाहीत.
सर्वोच्च न्यायालयाने म्हटले- आम्ही सत्येंद्र जैन यांना खासगी रुग्णालयात उपचार घेण्याची परवानगी देत आहोत. जैन कोणत्याही साक्षीदारावर प्रभाव टाकणार नाहीत. न्यायालयाच्या परवानगीशिवाय ते दिल्लीबाहेर जाणार नाहीत. जामिनादरम्यान जे काही उपचार केले जात असतील, त्याची कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करावीत.
31 मे 2022 पासून जैन कोठडीत
यापूर्वी 18 मे रोजी सर्वोच्च न्यायालयाने ईडीला नोटीस बजावून उत्तर मागितले होते. जैन 31 मे 2022 पासून कोठडीत आहेत. दिल्ली उच्च न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर 6 एप्रिल रोजी त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती.
आठवडाभरात तिसऱ्यांदा रुग्णालयात नेले
25 मे रोजी सकाळी आप नेते सत्येंद्र जैन तिहार तुरुंगातील वॉशरूममध्ये घसरून पडले होते. सकाळी त्यांना दीनदयाल उपाध्याय रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारी बाराच्या सुमारास त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना लोकनारायण जय प्रकाश रुग्णालयात (एलएनजेपी) हलवण्यात आले आणि त्यांना ऑक्सिजन सपोर्टवर ठेवण्यात आले होते.
एका आठवड्यात जैन यांना रुग्णालयात आणण्याची ही तिसरी वेळ होती. यापूर्वी 22 मे रोजी त्यांना दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले होते. त्यानंतर त्याच्या मणक्याचा त्रास होऊ लागला. 20 मे रोजीदेखील याच त्रासामुळे त्यांना दीनदयाल रुग्णालयात आणण्यात आले होते.
जाणून घ्या काय आहे सत्येंद्र जैन यांच्याशी संबंधित प्रकरण
सीबीआयने दाखल केलेल्या एफआयआरच्या आधारे अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) 24 ऑगस्ट 2017 रोजी जैन यांच्याविरुद्ध मनी लाँड्रिंगची चौकशी सुरू केली होती. 14 फेब्रुवारी 2015 ते 31 मे 2017 पर्यंत सत्येंद्र जैन यांनी अनेकांच्या नावे जंगम मालमत्ता खरेदी केल्या होत्या. ज्याचा त्यांना समाधानकारक हिशेब देता आला नाही. त्यांच्यासह पूनम जैन, अजित प्रसाद जैन, सुनील कुमार जैन, वैभव जैन आणि अंकुश जैन यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.