आशिष देशमुख यांची पक्षामधून हकालपट्टी
काँग्रेस नेते व माजी आमदार आशीष देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यांना काँग्रेसमधून 7 एप्रिल रोजी निलंबित करण्यात आले होते आणि आता 23 मे रोजी सहा वर्षांसाठी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
महाविकास आघाडीच्या छत्रपती संभाजीनगर येथील संयुक्त सभेला नाना पटोले अनुपस्थित होते. हे निमित्त साधून देशमुख यांनी नाना पटोले यांच्यावर कठोर टीका केली होती व त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. पटोले यांना राज्याच्या मुख्यमंत्र्यांकडून दर महिन्याला खोके मिळतात. त्यामुळे ते त्यांच्यावर टीका करीत नाही. मात्र भाजपा नेत्यांवर टीका करतात, असा आरोप देशमुख यांनी केला होता.
आशीष देशमुख यांनी यापूर्वी राहुल गांधी यांनी ओबीसींची माफी मागावी, असेही म्हटले होते. देशमुख वरिष्ठ नेत्यांबद्दल वारंवार आरोप आणि टीका करतात. त्यांच्या माध्यमातील विधानामुळे पक्षाची प्रतिमा मलीन होत असल्याने याबाबत त्यांना स्पष्टीकरण मागण्यात आले होते. तोपर्यंत माध्यमात वक्तव्य करू नये, असेही बजावण्यात आले. कारणे दाखवा नोटीसला तीन दिवसांत उत्तर न दिल्यास पक्षातून हकालपट्टी करण्यात येणार होती. त्या नंतर देशमुख यांनी 9 एप्रिल रोजी नोटिशीला उत्तर दिले होते. मात्र, त्यातही आपली मुजोरी कायम ठेवली होती.
आपण आपले पक्षविरोधी वर्तन व जाहीर वक्तव्याबद्दल दिलेले उत्तर समितीला समाधानकारक वाटत नाही. त्यामुळे काँग्रेसमधील शिस्तपालन समितीने सहा वर्षासाठी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वातून सहा वर्षांसाठी निष्कासित केल्याचे शिस्तपालन समितीचे अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रात नमुद केले आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत आशिष देशमुख भाजपच्या तिकिटावर काटोलमधून लढले होते आणि तेथे त्यांचे काका माजी मंत्री अनिल देशमुख यांचा त्यांनी पराभव केला होता. त्यानंतर ते भाजपमध्ये रमले नाही आणि स्वतंत्र विदर्भाच्या मुद्द्यावर त्यांनी आमदारकीचा राजीनामा देत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्येही त्यांचे फार काळ जमले नाही आणि त्यांनी थेट श्रेष्ठींसोबत पंगे घेणे सुरू केले. थेट राहुल गांधी यांना सल्ला देणे आणि प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात थेट भूमिका घेणे आशिष देशमुखांनी सुरूच ठेवले. त्यानंतर त्यांना नोटिसही बजावण्यात आली होती. नंतर निलंबित करण्यात आले. तेव्हाच देशमुख आता फार काळ काँग्रेसमध्ये थांबणार नाहीत असा अंदाज होता. निष्कासना नंतर हा अंदाज आता खरा ठरताना दिसत आहे.