आषाढीवारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर संबधित विभागांनी सर्व कामे 5 जुलै पर्यत पुर्ण करावीत… डॉ. नीलम गोऱ्हे
आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, या यात्रेसाठी पायी पालखी सोहळ्यासोबत मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक येतात. पालखी सोहळ्यासोबत येणा-या वारकरी भाविकांना पालखी मार्गावर व तळांवर तसेच यात्रा कालावधीत पंढरपूर शहरात व परिसरात सर्व पायाभूत सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच त्यांना कोणतीही अडचण येऊ याची दक्षता घेवून संबधित विभागांनी सर्व कामे दि.5 जुलै पर्यत पुर्ण करावीत अशा सूचना विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिल्या.
आषाढी पार्श्वभूमीवर श्री रुक्मिणी मंदीर देवस्थान व जिल्हा प्रशासनासोबत ऑनलाईन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी सूचना दिल्या. यावेळी ऑनलाईन बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्यकार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे, जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे, मंदीर समितीचे सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर, प्रांताधिकारी सचिन इतापे, मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, मुख्याधिकारी प्रशांत जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संतोष नवले, पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वहाणे, सां.बा. कार्यकारी अभियंता अमित निंबकर, अक्षय महाराज भोसले, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे श्री घोडके, पंढरपूर शहर विकास आराखडा व आपत्कालीन व्यवस्थापनाचे अभ्यासक सुनिल उंबरे तसेच संबधित विभागाचे अधिकारी उस्थित होते.
यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, प्रत्येक शासकीय विभागांनी परस्परात समन्वय ठेवून आषाढीवारी निमित्त त्यांच्या विभागामार्फत करण्यात येणारी सर्व कामे विहति कालावधीत पुर्ण करावीत. वारकरी भाविकांना पालखी मार्गावर, रिगंण सोहळा व प्रदक्षिणा मार्गावर भाविकांना खडी टोचणार नाही याची दक्षता घ्यावी. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने पालखी मार्गाची वेळेत करावीत.
स्वच्छता कर्मचाऱ्यांना रेनकोटसह सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक साहित्याचा पुरवठा करण्यात यावा. वारी कालावधीत पावसाळा असल्याने डास होण्याची शक्यता असून नगरपालिकेने डास प्रतिबंध उपाययोजना कराव्यात. शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा.
भाविकांच्या सुरक्षेसाठी महावितरण व नगरपालिका प्रशासनाने विद्युत साक्षरता व जनजागृती मोहीम राबवावी.
आरोग्य विभागाने खाजगी हॉस्पिटल मध्ये राखीव बेडची उपलब्धता ठेवावी. तसेच आयसीयू बेडची संख्या वाढवावी. पालखी मार्गावर महिला कक्ष, चेंजिंग रूम, सॅनिटरी नॅपकिन आदी व्यवस्थितेची उपलब्धता ठेवावी. वारी कालावधीत महिला वारकरी भाविकांना कोणताही त्रास होऊ नये याची दक्षता घ्यावी. एसटी महामंडळामार्फत उभारण्यात येणाऱ्या खाजगी बस स्थानकावर स्वच्छता , मुबलक शौचालय तसेच सुरक्षा व्यवस्था ठेवावी
नदीपात्रात धोकादायक ठिकाणी माहिती फलक लावावेत. वारकऱ्यांच्या सुखमय प्रवासासाठी एसटी बसेस तपासणी करून सुस्थितीत असण्याची खात्री करावी
तसेच आषाढी यात्रा कालावधीत श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी दर्शन रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांसाठी दर्शन रांगेत बैठक व्यवस्था मंदिर समितीने करावी.
आषाढी एकादशी दिवशी राजगिरा लाडूची संख्या वाढवावी. मुख्य दर्शनी मंडपात हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.
टोकन दर्शनी व्यवस्था सुरू करण्याबाबत मंदिर समितीने कार्यवाही करावी जेणेकरून वारकरी भाविकांचा दर्शनाचा वेळ वाचेल .
मंदिर समितीचे जतन व संवर्धनाचे काम सध्या असून उत्खननात सापडलेल्या पुरातन मुर्त्याची नोंद महसूल प्रशासनाकडे करावी.
वारी कालावधी वारकरी भाविकांना प्रशासनाकडून सोयी सुविधा पुरविण्यात येतात यासाठी मोठ्या प्रमाणात अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती केली जाते त्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्यावी असे आवाहन ही विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. गोऱ्हे यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद माहिती देताना म्हणाले, आषाढी यात्रा सोहळ्यात वारकऱ्यांना केंद्रबिंदू मानून आषाढी वारीचे पूर्व नियोजन करण्यात आले आहे. आषाढी शुद्ध एकादशी सोहळा 17 जुलै 2024 रोजी होणार असून, पालखी सोबत येणाऱ्या वारकरी भाविकांना पालखी मार्ग, विसावा तसेच पालखी तळांवर आवश्यक असलेल्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत.
वारकरी भाविकांना तात्काळ सुविधा उपलब्ध व्हाव्यात तसेच सुरक्षेबाबत दक्षता घेण्यासाठी 25 हजार 500 अधिकारी कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच 34 आपत्ती प्रतिसाद प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहे
आषाढी वारी सुखकर व निर्विघ्नपार पाडण्यासाठी प्रशासनाकडून सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून पालखी मार्गावर वारकऱ्यांच्या सुविधेसाठी वॉटरप्रुफ मंडप, महिला कक्ष, चेजिंग रुम, वैद्यकीय व्यवस्था आदीबाबत माहिती दिली. तर वारकरी भाविकांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक नियोजन केल्याचे जिल्हा पोलीस अधिक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी सांगितले.
यावेळी मंदीर समितीचे सह. अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर व कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी आषाढी यात्रा कालावधीत वारकरी भाविकांच्या सोयी-सुविधांबाबत मंदीर समितीकडून करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती दिली. तसेच भाविकांना जलद व सुलभ दर्शन व्हावे याबत नियोजन करण्यात आले असल्याचेही सांगितले.