इस्लामिक रिफायनरीसाठी हिंदुवर अत्याचार केले जात आहे, हा कोणता न्याय आहे? -संजय राऊत
रत्नागिरीतील बारसू येथे सौदी अरेबियातील इस्लामिक ऑईल रिफायनरी कंपनीकडून प्रकल्प उभारला जात आहे. म्हणजेच इस्लामिक ऑईल रिफायनरीसाठी रत्नागिरीतील स्थानिकांना, हिंदुंना निर्घृण मारहाण केली जात आहे. हेच या सरकारचे हिंदुत्व, अशा शब्दांत ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
इस्लामिक रिफायनरीसाठी हिंदुवर अत्याचार केले जात आहे, हा कोणता न्याय आहे? शिंदे-फडणवीस सरकारचे हे कोणते हिंदुत्व आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी केला.
राष्ट्रवादीसोबत मतभेद नाहीत
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी प्रकल्प राज्याच्या हिताचा असेल तर स्थानिकांची नाराजी दूर केली पाहीजे, असे म्हणत प्रकल्पाबाबत मवाळ भूमिका घेतली आहे. तर, उद्धव ठाकरे यांनी प्रकल्पाविरोधात आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसत आहे. त्यामुळे बारसूवरून राष्ट्रवादी काँग्रेस व ठाकरे गटात मतभेद असल्याचे दिसत आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, अजित पवार व ठाकरे गटात कोणतेही मतभेद नाहीत. तसेच, उद्धव ठाकरेंनी आदेश आणि सूचना दिल्या की महाविकास आघाडीतील मतमतांतरे संपवून टाकू.
उद्धव ठाकरेंचाच निर्णय अंतिम
ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांनीदेखील प्रकल्पाला समर्थन देणारी भूमिका घेतली आहे. यावर संजय राऊत म्हणाले की, उद्धव ठाकरे यांची भूमिका हीच पक्षाचीच भूमिका आहे. ठाकरे गटाचे सर्व आमदार पक्षाच्या निर्णयाला बांधिल आहेत. आमदारांमध्ये काही मतभिन्नता असेल तर आम्ही सर्वजण पक्षप्रमुखांशीस चर्चा करोत आणि उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील, तो मान्य करतो. आताही आम्ही तसेच करू.
बारसूतील आंदोलक स्थानिकच
बारसू येथील आंदोलक हे स्थानिक नसून बाहेरचे आहेत, असा दावा उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला आहे. त्यावर संजय राऊत म्हणाले, आंदोलक बाहेर म्हणजे मॉरिशस, सुदान येथून आले आहेत काय? बारसूमधीलच ग्रामस्थ या प्रकल्पाविरोधात आंदोलन करत आहेत. कोकणातून जे चाकरमाने मुंबईत आले आहेत, तेच आपले गाव वाचवण्यासाठी मुंबईत आले आहेत. कोकणातील 70 टक्के घरातील तरुण मुल हे नौकरीसाठी मुंबईला गेलेआहेत. तेच आता आंदोलनात उतरले आहेत. इस्लामिक ऑईल कंपनीच्या दलालांना हे माहित नसेल तर त्यांनी आमच्याकडून हे जाणून घ्यावे.