एमपीडीए कायद्यांतर्गत वाळू तस्करास स्थानबद्ध केल्याचा आदेश : उच्च न्यायालयामार्फत रद्दबातल…
जिल्हाधिकारी सोलापूर यांनी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या आधारे वाळू तस्कर म्हणून तुकाराम बिरप्पा पुजारी रा. हिळ्ळी, ता अक्कलकोट यास एम पी डी ए कायद्याअंतर्गत एक वर्षाच्या कालावधी करिता स्थानबद्ध करण्याचा आदेश मे.उच्च न्यायालयामार्फत रद्दबातल करण्यात आला.
यात हकीकत अशी की, तुकाराम बिरप्पा पुजारी रा.हिळ्ळी, तालुका अक्कलकोट यांचेविरुद्ध अवैध वाळू उत्खनन, वाहतूक व चोरी केल्याप्रकरणी व शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीच्या गुन्ह्याच्या आधारे व दोन गोपनीय साक्षीदारांचे तुकाराम पुजारी याचे बाबतीत गुन्हेगारी कृत्य दहशत व समाजात अशांतता पसरविण्याचे काम करीत असलेबाबत जबाब या आधारे पोलीस खात्यामार्फत तुकाराम पुजारी यास एम पी डी ए कायद्याचे कलम दोन अन्वये वाळू तस्कर असल्याने एक वर्षाकरिता स्थानबद्ध करण्याचा प्रस्ताव जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे पाठविण्यात आल्याने दि 3/4/2024 रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी तुकाराम पुजारी यास वाळू तस्कर आहे, असे निष्कर्ष नोंदवून एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध केल्याने त्याची रवानगी येरवडा कारागृहामध्ये करण्यात आली होती.
तुकाराम पुजारी याने सदर आदेशास ॲड रितेश थोबडे यांचेमार्फत मे. उच्च न्यायालयांमध्ये फौजदारी याचिका दाखल करून आव्हान दिले होते.
सदर याचीकेच्या सुनावणीच्या वेळी ॲड रितेश थोबडे यांनी अंतिम युक्तीवादामध्ये एमपीडीए कायद्याचे कलम दोन अन्वये वाळू तस्कर आहे असे गृहीत धरण्याकरिता गौण खनिज कायद्यान्वये त्या व्यक्तीविरुद्ध गुन्हे दाखल असणे आवश्यक असून एखाद्या व्यक्तीची पार्श्वभूमी व त्याचे गुन्हेगारी वर्तणुकीच्या आधारे ती व्यक्ती वाळू तस्कर आहे असे म्हणून स्थान बद्धतेची कारवाई करणे योग्य होणार नाही व याचिकाकर्त्याच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीचा विचार करता, तो वाळू तस्कर आहे असे म्हणता येणार नाही असे मुद्दे मांडले व त्यापुष्ट्यर्थ मे.उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले ते ग्राह्य धरून मे.उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्रीमती भारती डांगरे व न्यायमूर्ती श्रीमती मंजुषा देशपांडे यांच्या पिठाने तुकाराम पुजारी याच्या विरुद्धची स्थानबद्धतेची कारवाई बेकायदेशी ठरवून जिल्हाधिकाऱ्यांच्या स्थानबद्धतेचा आदेश रद्दबादल केला.
यात याचिकाकर्त्यातर्फे ॲड रितेश थोबडे, ॲड राजकुमार मात्रे यांनी तर सरकार तर्फे ॲड.श्री जे पी याग्निक यांनी काम पाहिले