कर्नाटकातला पाळणा तुम्हाला हलला नाही – एकनाथ शिंदे
कर्नाटकात पाळणा हलवायला तुम्ही गेला होतात, पण तो हलला नाही, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रत्युत्तर दिले. ते पुण्यात बोलत होते.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता गमावावी लागली. काँग्रेस स्पष्ट बहुमत मिळवून सत्तेत येत आहे. त्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.
भाजपला मोठा संदेश
एकनाथ शिंदे यांनी मूल जन्मले एका ठिकाणी, बारसे दुसऱ्या ठिकाणी अशी टीका केली होती. त्याला रोहित पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कर्नाटकमध्ये अनेक मोठे नेते प्रचारासाठी गेले. महाराष्ट्रातल्या मोठ्या नेत्यांनी तिथे प्रचार सभांचा सपाटा लावला. मात्र, तरीही भाजपला पराभव पत्करावा लागला. हा मोठा संदेश असल्याचे ते म्हणाले.
उगाच गंडवू नका
रोहित पवार पुढे म्हणाले की, भाजपने कर्नाटकमध्ये खूप ताकद लावली. मात्र, निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला. त्यामुळे पाळणा कुठे, बारसे कुठे याला अर्थ नाही. तुम्हीही पाळणा हलवायला तिथे गेला होतात, पण तुमचा पाळणा हलला नाही. लोकांनी लोकशाहीचा पाळणा हलवला. आता उगीच शब्दांचे खेळ करू नका. महाराष्ट्रातली जनताही एवढी साधीसुधी नाही. संत, थोर व्यक्तींच्या विचारांनी त्यांची बुद्ध चांगली झाली आहे. त्यांना उगाच गंडवू नका. ते योग्य निर्णय घेतील, असा टोलाही त्यांनी हाणला.
लोकशाहीला कौल
रोहित पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल यायला नऊ महिने लागले. लोकशाही मार्गाने सत्ताबदलाची संधी मिळाली की, लोक लोकशाहीच्या बाजूने निर्णय घेतात. हेच कर्नाटकात दिसले. महाराष्ट्रातही तसेच चित्र असेल. लोक भाजविरोधात मतदान करतील, असा दावा त्यांनी केला.
ध्रुवीकरण फसले
रोहित पवार म्हणाले की, कर्नाटकात ध्रुवीकरणाचे प्रयत्न फसले. पैशाच्या वापराला यश मिळाले नाही. असेच इतर राज्यातही घडेल. या निकालानंतर महाराष्ट्र भाजपमध्ये अस्वस्थता आहे. शिंदे गटही अस्वस्थ आहे.येणाऱ्या लोकसभा, विधानसभेचा निकाल भाजपविरोधात असेल, असा दावा त्यांनी केला.